विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानाची रक्कम शासनाकडे पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:11 AM2020-12-22T04:11:56+5:302020-12-22T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अपघातग्रस्त विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अपघातग्रस्त विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. मात्र, शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागांना निधीचे वाटप करूनही तब्बल १ कोटी ११ लाख ५ हजार रुपये निधी खर्चच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या नुकसानीची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यात विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांना ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक अवयव व डोळा निकामी झाल्यास ३० हजार रुपये अनुदान दिले जाते.
राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभाचा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. त्यानुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षात एकूण ६३५ विद्यार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे ४ कोटी ६७ लाख २९ हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित केली गेली. त्यातील केवळ ३ कोटी ५६ लाख १६ हजार रुपये रक्कमच ४८३ अपघातग्रस्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत पोहचली. त्यामुळे १ कोटी ११ हजार ५ हजार रक्कम वितरित करूनही लाभार्थ्यांना मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
--------------