आमडेची जागा व घरांबाबत संभ्रम
By Admin | Published: July 25, 2015 05:04 AM2015-07-25T05:04:32+5:302015-07-25T05:04:32+5:30
माळीणचे पुनर्वसन होत असलेल्या आमडेच्या जागेबाबत ग्रामस्थांच्या मनात संभ्रम आहे. माळीण गावावर ढाळसलेला डोंगर व हा डोंगर एकच आहे;
घोडेगाव : माळीणचे पुनर्वसन होत असलेल्या आमडेच्या जागेबाबत ग्रामस्थांच्या मनात संभ्रम आहे. माळीण गावावर ढाळसलेला डोंगर व हा डोंगर एकच आहे; मग येथे पुन्हा अशी घटना घडली तर काय? या जागेमध्ये दर लागत नाहीत मग घरे पक्की कशी राहणार? घरे चाळीसारखी बांधली जाणार आहेत; मग जनावरे कुठे बांधायची? असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत.
माळीणची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने अडिवरे, झांजरेवाडी व कोकणेवाडी या तीन जागा पाहिल्या; परंतु त्यांतील एकही जागा निश्चित होऊ शकली नाही. त्यानंतर कशाळवाडीची जागा पाहिली; पण येथे ८ एकर जागा मिळू शकली नाही म्हणून चिंचेचीवाडी व आमडे येथील दोन जागा पाहण्यात आल्या. यातील आमडे जागेला ग्रामस्थ, जीएसआय अशी सर्वांनी सहमती दिली. परंतु, त्यानंतर ग्रामस्थांमध्ये या जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
जिओलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या लोकांनी पाहणी केली असता तेथे दर लागत नाहीत, खोल खोदले तरी माती, मुरूमच लागतो. त्यामुळे घरे बांधणे धोकादायक आहे, असे जीएसआयच्या काही लोकांनी ग्रामस्थांना सांगितले. दोन घरांची भिंत एकच असेल. एकाच भिंतीवर दोघांचे आडे असले, तर कसे होईल? तसेच ९ इंची वीट बांधकाम धरले आहे. असे बांधकाम झाले तर भिंतींमध्ये पाणी झिरपून घरात ओलावा तयार होईल. पावसाळ्यात या घरांमध्ये राहता येणार नाही. तसेच, आम्हाला दिला जाणाऱ्या दीड गुंठ्याच्या प्लॉटमध्ये घरे वेगवेगळी बांधून हवी आहेत.
कारण आम्हाला कोंबड्या, शेळ्या पाळाव्या लागतात, सरपण भरावे लागते. जर तुम्ही चाळ बांधली तर हे सगळे कुठे ठेवणार? पूर्वीच्या गावामध्ये झांजरे, पोटे, लेंभे यांची घरे एकत्र होती. जर ड्रॉ पद्धतीने वाटप झाले, तर कोणी कुठेही जाईल. पहिल्यापासून एकत्र राहणारे लोक वेगवेगळे राहू शकणार नाहीत, अशा स्वरूपाच्या शंका व भीती माळीण ग्रामस्थ मांडत आहेत.