Amrit Bharat Station Scheme: केंद्राच्या अमृत भारत योजनेत पुणे विभागातील १० रेल्वे स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:21 PM2024-02-22T12:21:14+5:302024-02-22T12:24:38+5:30
देहूरोड, चिंचवड, हडपसर, उरुळी कांचन, केडगाव, बारामती, तसेच लोणंद, वाठार, कराड आणि सांगली रेल्वेस्थानकांचा समावेश आहे....
पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पात अमृत भारत स्टेशन योजनेत महाराष्ट्रातील ५६ रेल्वेस्थानकांना जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागातील १० रेल्वेस्थानकांचा समावेश केला आहे. देहूरोड, चिंचवड, हडपसर, उरुळी कांचन, केडगाव, बारामती, तसेच लोणंद, वाठार, कराड आणि सांगली रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.
पुणे रेल्वेस्टेशनला पर्याय म्हणून हडपसर रेल्वेस्थानक विकसित करण्यात येणार आहे. या रेल्वेस्थानकासाठी नवीन इमारतीची तरतूद केली आहे. कार्यालय, व्हीआयपी लाऊंज, पहिला व द्वितीय श्रेणी विश्रांती कक्ष, कॅन्टीन कॅफेटेरिया, क्लॉक रूम, सुधारित स्वच्छतागृह, आरपीएफ कार्यालय, पोस्ट कार्यालय, पार्किंग सुविधा, पार्किंगपासून प्रवेशद्वारापर्यंत पादचारी मार्ग, लिफ्ट, रॅम एस्केलेअर, द्विव्यांगांसाठी सुविधा, अतिरिक्त आसनव्यवस्था अशा सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.
इतर रेल्वेस्थानकांचा दर्शनी भाग सुधारणेसह प्रवेशद्वार आणि पोर्टिकोची तरतूद केली आहे. पार्किंग सुविधा, तसेच पार्किंगपासून प्रवेशद्वारापर्यंत आच्छादित पादचारी मार्ग, आसन सुविधांची क्षमता वाढ, संपूर्ण फलाट आच्छादित करणे, द्विव्यांगांसाठी फ्रेंडली स्वच्छतागृह, कोच इंडिकेशन बोर्डची तरतूद, व्हिडीओ डिस्प्ले युनिट बुकिंग कार्यालयाचे नूतनीकरण, विश्रांती कक्षाचे नूतनीकरण, पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा अशी कामे केली जाणार आहेत.