हजारो किलोमीटर उडत ‘द अमूर फाल्कन’ पुण्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:41+5:302021-01-04T04:09:41+5:30
गवतावर विसावला : संजू फडतरे यांनी लोणावळ्यात टिपले छायाचित्र लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणारा ...
गवतावर विसावला : संजू फडतरे यांनी लोणावळ्यात टिपले छायाचित्र
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणारा पक्षी’ अशी खासियत असलेला अमूर फाल्कन हजारो किलोमीटरचे अंतर पार करत लोणावळ्यात विसावला! छायाचित्रकार संजू फडतरे यांनी या सुंदर पक्ष्याची छबी कॅमेराबद्ध केली आहे. अमूर फाल्कन समूहात स्थलांतर करणारा पक्षी आहे. मात्र, लोणावळ्यात नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे कुटुंब गवतावर विसावले होते. काहीशी विश्रांती घेऊन हा पक्षी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने झेप घेईल.
अमूर फाल्कन वर्षातून दोनदा ये-जा करतो. २०१२ नंतर तब्बल ९ वर्षांनी फाल्कन पुण्यात स्थिरावला. या पक्ष्याचा अर्धा मेंदू कायम सतर्क असतो. त्यामुळे फाल्कन सलग २ दिवस १७ तास उडू शकतो. भारतात अमूर, मर्लिन, शाईन आणि पेरिग्रीन असे चार प्रकारचे फाल्कन पाहायला मिळतात. कीटक, बेडूक किंवा काही वेळा छोटे पक्षी हे अमूर फाल्कनचे खाद्य आहे. चीनवरुन अमूर फाल्कन नागालँड आणि तेथून पुण्यात आले असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संजू फडतरे यांनी नुकतेच लिटील रण ऑफ कच्छ येथे मर्लिन फाल्कनचे छायाचित्रही टिपले आहे. संजू फडतरे हे मूळचे पुण्याचे असून, गेल्या चार-पाच वर्षांपासून छायाचित्रणाचा छंद जोपासत आहेत. त्यांनी दक्षिण भारत, उत्तर भारत, राजस्थान, गुजरात अशा विविध ठिकाणी छायाचित्रण केले आहे.
---
इरांग आणि च्युलॉन हे दोन अमुर फाल्कन स्थलांतर करत नुकतेच मणिपूरला परतले. सॅटेलाईट रेडिओ टॅग केलेल्या या दोन पक्ष्यांचे नामकरण करण्यात आले आहे. इरांग या पक्ष्याने वर्षभरात २९,००० किलोमीटरचे, तर च्युलॉनने ३३,०००० किलोमीटरचे अंतर पार केले आहे.
-----
अमूर फाल्कन हा पक्षी वर्षभरात २२ हजार ते ३३ हजार किलोमीटरचे अंतर पार करतो. नागालँड ते सोमालिया हे जवळपास ४००० किलोमीटरचे अंतर फाल्कन न थांबता जातो. हा पक्षी साधारणपणे तारेवर बसतो. यंदा, लोणावळ्यात गवतावर हा पक्षी उतरला. उडून दमल्यामुळे थोडा विसावा घेण्यासाठी आणि अन्नग्रहण करण्यासाठी अमूर फाल्कन उतरला असावा.
- संजू फडतरे