रांजणखळगे पाहण्यासाठी गेलेला १८ वर्षीय युवकाचा घोडनदीत बुडून मृत्यू; शोधमोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:52 PM2023-01-09T19:52:41+5:302023-01-09T19:53:04+5:30
सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, परंतु तो मिळून आला नाही...
घोडेगाव (पुणे) : चास (ता.आंबेगाव) येथील रांजणखळगे पाहण्यासाठी गेलेला १८ वर्षीय युवक घोडनदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी सांयकाळी घडली. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली, परंतु तो मिळून आला नाही.
नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प. सबनिस महाविद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे इ. १२ वीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी साईप्रसाद बालमालकोंडाया वेन्नापुसा (रा. हिरवेतर्फे नारायणगाव, खोडद ता. जुन्नर. मूळ रा. नेरडपल्ली आंध्र प्रदेश) याचा वाढदिवस असल्याने आदित्य सुनील थोरवडे व आशुतोष राजेंद्र कोल्हे (रा.नारायणगाव, ता. जुन्नर) या मित्रांसोबत दुचाकीवरून (एम एच १४ एए - २३९२) यावरून चास येथे फिरायला सकाळी ९.३० वाजता आले.
सकाळी ११.३० वाजता या मुलाचे वडील बालमालकोंडाया पेदमालकोंडाया वेन्नापुसा यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फोनद्वारे माहिती दिली की, मित्रांसोबत घोडनदीच्या पाण्यात पोहण्यासाठी माझा मुलगा गेला होता, पण अजून सापडलेला नाही. त्यानंतर, पोलिस, आपदा मित्र व स्थानिक ग्रामस्थांनी नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला, पण सायंकाळपर्यंत तो मिळून आला नाही. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईल विठ्ठल वाघ करत आहेत.