आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी आईला भेटायला आला अन् पोलिसांना सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:15 AM2024-03-27T10:15:15+5:302024-03-27T10:20:01+5:30
आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून १० लाखांचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे....
पुणे : पुण्यातून पर्दाफाश झालेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात महिन्याभरापासून फरार असलेला आरोपी आईला भेटण्यासाठी पुण्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून १० लाखांचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
शोएब सईद शेख (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या एक महिन्यापासून फरार होता. चौकशीत तो फरार काळात जळगाव, पंढरपूर, शिर्डी अशा ठिकाणी फिरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तो हैदर शेख याच्यासोबत माल पुरवणे आणि गोडाउनमध्ये ठेवणे तेथून पुढे पाठवणे असे काम करत होता. न्यायालयाने आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
पुण्याच्या मध्यभागात एका सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून अर्धा किलो मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतरच्या तपासात गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ एमआयडीसी, दिल्ली व सांगली शहरात छापेमारी करत ३६०० कोटींचे ड्रग्ज जप्त करत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले होते. याप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी १३ जणांना अटक केली, तर या गुन्ह्याचा मास्टरमाइंड संदीप धुणे, अशोक मंडल व वीरेंद्रसिंग बसोया हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.