Pune: मैत्रिणींवरून वाद पेटला अन् तरुणाच्या डोक्यातच घातला दगड, मुंढव्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 14:04 IST2024-04-30T14:03:12+5:302024-04-30T14:04:39+5:30
तरुणाला रास्ता पेठेतून मुंढव्यात नेत बेल्टने जबर मारहाण करून डोक्यात दगड घातला...

Pune: मैत्रिणींवरून वाद पेटला अन् तरुणाच्या डोक्यातच घातला दगड, मुंढव्यातील घटना
पुणे : मैत्रिणीच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने एका ३० वर्षीय तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तरुणाला रास्ता पेठेतून मुंढव्यात नेत बेल्टने जबर मारहाण करून डोक्यात दगड घातला. पण, सुदैवाने यात तरुण वाचला असून, तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सोहेल सलीम मुल्ला (२२, रा. विमाननगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर त्याचा साथीदार फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी अभिषेक गायकर (३०) याने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या घटनेत अभिषेक जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल आणि अभिषेक हे दोघे एकमेकांना ओळखतात. दरम्यान, अभिषेकला सोहेलची एक मैत्रीण बोलत असल्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाले. वादानंतर रविवारी (दि. २८) रात्री अभिषेकला रविवार पेठेत गाठून दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवरून मुंढवा येथील कुंभारवाडा चौक येथे नेले. तसेच, त्याठिकाणी बेल्टने बेदम मारहाण केली. तो खाली पडल्यानंतर आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने अभिषेक बाजूला झाल्याने तो बचावला. त्यानंतर आरोपी तेथून गेले. त्यांनी जाताना पोलिसांकडे तक्रार दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक माने करत आहेत.