पुण्यात शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण; उद्धवसेनेला एकच जागा तर शिंदेगटाला एकही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 05:17 PM2024-10-28T17:17:10+5:302024-10-28T17:18:24+5:30
माविआ कडून ठाकरे गटाला एकाच जागेवर समाधान, तर महायुतीमध्ये शिंदेसेनेला मात्र पुण्यात एकही जागा देण्यात आली नाही
पुणे : शिवसेना पक्ष फुटीनंतर प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. महाविकास आघाडीमध्ये पुण्यात उद्धवसेनेला कोथरूडची जागा देण्यात आली आहे. यामुळे केवळ एका जागेवर उद्धवसेनेला समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये शिंदेसेनेला मात्र पुण्यात एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट ही महायुती आणि काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ही महाविकास आघाडी याप्रकारे निवडणुकीला सामोरे गेले होते. शिवसेेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गट प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. उद्धवसेनेला पुण्यातील आठपैकी केवळ एक जागा मिळाली आहे. महाआघाडीत कोथरूडची जागा उद्धवसेनेला मिळाली असून, येथे चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांच्यातच खरा सामना रंगणार आहे.
शिंदेसेनेला पुण्यात एकही जागा नाही
पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ असून, जागा वाटपात महायुतीमध्ये भाजपला कोथरुड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला आणि कसबा हे सहा मतदारसंघ आहेत, तर राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकडे वडगाव शेरी, हडपसर मतदारसंघ आहेत. हडपसर मतदारसंघ शिंदेसेनेला मिळण्यासाठी प्रयत्न केला जात होता. त्यासाठी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे प्रयत्न करत होते. मात्र, हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदेसेनेला पुण्यात एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
हडपसर मतदारसंघ न मिळाल्यामुळे बाबर नाराज
महाविकास आघाडीत हडपसर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर उद्धवसेना मागत होता; पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाली आहे. पुणे शहरात उद्धवसेनेला एक जागा मिळाल्यामुळे उद्धवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर हे नाराज झाले आहेत. बाबर हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे.