बिल्डिंग सुपरवायझरकडूनच विद्यार्थ्यावर अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यातील नामांकित शाळेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 10:55 AM2024-04-23T10:55:01+5:302024-04-23T10:55:41+5:30
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे...
पुणे : वाघोली परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमातील शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला असून, शाळेच्या बिल्डिंग सुपरवायझरकडूनच सहावीच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला. त्याने अश्लील चाळे केल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. याप्रकरणी विमल राव (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलाच्या आईने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाची एक नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. याठिकाणी आरोपी राव हा बिल्डिंग सुपरवायझर आहे. पीडित मुलगा दहा वर्षांचा असून, तो सहावीच्या वर्गात आहे. दरम्यान, पीडित मुलगा शुक्रवारी (दि. १९) नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. त्याला शाळेत सोडल्यानंतर आरोपीने त्याला अडवले व नाव विचारून तू फिल्म पाहतो की नाही. चल टॉयलेटमध्ये फिल्म दाखवतो म्हणत त्याला नेण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने त्याला सीसीटीव्ही देखील बंद आहेत. तू कोणाला सांगू नको, असे म्हणत बळजबरीने टॉयलेटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा पळाला. थोड्यावेळाने मुलगा क्लासमध्ये येऊन बसला. तेव्हा आरोपी क्लासमध्ये आला. त्याने तुला टॉयलेटमध्ये यायचे नाही तर नको येऊ. तुला इथेच फिल्म दाखवतो, असे म्हणून मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ सुरू केला. त्यावेळी मुलाने आरडाओरडा केला. तरी देखील आरोपीने त्याला कोणाला काही सांगू नको म्हणत धमकावले. त्यानंतर तो निघून गेला. दोन दिवसांनी खासगी क्लासमध्ये मुलाने घडलेल्या प्रकाराची माहिती शिक्षकांना दिली. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.