Pune: अवसरीत विद्यार्थिनीच्या हातावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न, मुलींमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 02:50 PM2023-11-25T14:50:37+5:302023-11-25T14:50:48+5:30
काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे दोन घटना विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे...
अवसरी (पुणे) : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा हात धरून हातावर स्प्रे मारण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला. या घटनेमुळे पालक व विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे दोन घटना विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा एकदाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अवसरी खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालय शिक्षक घेत असलेल्या पाचवी व आठवीतील दोन सख्या बहिणी शुक्रवारी (दि २४) सकाळी साडेदहा वाजता विद्यालयात जात होत्या. जुन्या बँक बडोदा शाखेजवळ दोन मोटरसायकलवर आलेल्या चार व्यक्तींनी रस्त्यावर जात असलेल्या मुलींना थांबवत एका मुलाने इयत्ता पाचवीच्या मुलीचा हात हातात धरला. त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने खिशातून स्प्रे काढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान साधून तिच्या मोठ्या बहिणीने बॅगमधील भरलेली पाण्याची बॉटल हात धरलेल्या मुलाच्या हातावर जोरात मारत आरडाओरडा केला. त्यावेळी ते चौघेजण मोटार सायकलवर पळून गेले. त्यांच्याबरोबर एक चार चाकी वाहन व त्याच्यात सहा ते सात व्यक्ती असल्याचेही या मुलींनी सांगितले.
दोघी बहिणी घाबरलेल्या अवस्थेत घरी गेल्या असता आई वडील कामानिमित्त बाहेर गेल्याने घराला कुलूप होते. संशयित व्यक्ती आपला पाठलाग करतील या भीतीने दोघी बहिणी घराशेजारील पूर्ण वाढ झालेल्या कडवळाच्या पिकात दोन तास लपून बसल्या. काही दिवसांपूर्वी भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा घटना घडल्याने विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकाचे मोबाईल नंबर घेऊन ठेवले आहेत. या दोन बहिणी शाळेत का आले नाही याबाबत शिक्षकांनी पालकांना घरी फोन करून विचारले असता त्यांच्या घरच्यांनी मुली शाळेत गेल्या असल्याचे सांगितले. त्यावेळी कुटुंबियांनी मुलींचा शोध घेतला असता त्या शेतात मिळून आल्या.
दोन महिन्यापूर्वी तांबडेमळा येथील मुली शिक्षण घेण्यासाठी गावात येत असताना दोन मुलींना अडवून तोंडावर स्प्रे मारणे, सायकल अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर ही तिसरी घटना घडल्याने मुलींसह, पालकांमध्ये भीतीच्या वातावरण पसरले आहे.
दरम्यान अवसरी खुर्द गावात असे प्रकार वारंवार घडत असून अवसरी बीट अंमलदार मात्र गावात फिरताना दिसत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे ग्रामीण अधिक्षक यांनी मंचर पोलीस ठाण्याला योग्य त्या सूचना द्याव्यात. तसेच बीट अंमलदाराची बदली करुन अवसरी खुर्द येथील घटनेचा मंचर पोलिसांनी तत्काळ तपास करून योग्य ती उपाययोजना राबवावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.
भैरवनाथ विद्यालयात चालू बंद होण्याच्या वेळेस सिव्हील ड्रेसमध्ये पोलीस व्हॅन पाठवली जाईल. साध्या गणवेशातही महिला पोलीस फिरून गावात लक्ष ठेवणार असून गाव व शाळा परिसरात संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळल्यास ०२१३३-२२३१५९ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी केले आहे.