आत्या असल्याचे सांगून पुण्यात शाळेतून ५ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:30 IST2022-08-24T13:30:46+5:302022-08-24T13:30:58+5:30
त्याचवेळी मुलीचे वडील शाळेत आल्यामुळे अनर्थ टळला...

आत्या असल्याचे सांगून पुण्यात शाळेतून ५ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न
- नम्रता फडणीस
पुणे : पाच वर्षाच्या मुलीच्या शाळेतील शिक्षकांना आपण तिची आत्या असल्याचे सांगत मुलीला पळवून नेण्याचा प्रकार घडला. सुदैवाने मुलीचे वडील शाळेत आले होते आणि त्यांनी मुलीला घेऊन जात असताना महिलेला अडविले. तेव्हा त्यांनाच आपण तिची आत्या असल्याचे महिलेने सांगितल्यामुळे तिचा बनाव समोर आला. खडकी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. खडकी येथील एका शाळेत ही घटना घडली.
छाया युवराज शिरसाठ (वय २८, रा. अकोला) असे या महिलेचे नाव आहे. हा प्रकार खडकीतील एका शाळेत मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला. याबाबत खडकीतील एका ३५ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही मुळची अकोला येथील राहणारी असून ती मानसिक समस्येने ग्रस्त आहे. ती सोमवारी पुण्यात आली होती. खडकीतील एका सोसायटीमधील एका घराची तिने मध्यरात्री बेल वाजून त्यांना तुमच्याकडे काम असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी इतक्या रात्री आल्याने शंका घेऊन सुरक्षारक्षकाला बोलावून तिला बाहेर काढले होते. त्यानंतर ती खडकीतील शाळेत गेली.
फिर्यादी यांची ५ वर्षाची मुलगी खासगी शाळेत शिकते. शाळा सुटल्यावर तिला आणण्यासाठी ते शाळेत गेले होते. तेव्हा या महिलेने शाळेतील शिक्षकांना व तेथील उपस्थित पालकांना आपण मुलीची आत्या आहे, असे सांगून मुलीच्या हाताला धरुन तिला घेऊन ती जाऊ लागली होती. सुदैवाने फिर्यादी हे वेळेवर पोहचले. त्यांनी हा सर्व प्रकार पाहून त्यांनी या महिलेकडून मुलीला ताब्यात घेतले़. या महिलेला पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.