पुण्यातील एका नामांकित ज्वेलर्सच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न; ९ जणांना फोन करून करोडोंची मागणी
By भाग्यश्री गिलडा | Published: March 25, 2024 08:11 PM2024-03-25T20:11:30+5:302024-03-25T20:11:55+5:30
व्यावसायिकाला संशय आल्याने त्यांनी खात्री करण्यासाठी पुण्यातील ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे समोर आले
पुणे : पुण्यातील एका नामांकित दागिने विक्रेत्याच्या नावाने नांदेडमधील व्यावसायिकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत संबंधित मालकाने सोमवारी (दि. २५) स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
अधिक माहितीनुसार, हा प्रकार १४ मार्च २०२४ रोजी घडला आहे. मोबाईलमधील ट्रू कॉलर अप्लिकेशनमध्ये नामांकित ज्वेलर्सच्या मालकाचे नाव आणि त्यांच्या फोटोचा वापर करून सायबर चोरट्याने नांदेड येथील एका दागिन्यांच्या व्यावसायिकाला फोन केला. मी पुण्यातील नामांकित ज्वेलर्सचा मुलगा बोलत आहे. मला पैश्यांची आवश्यकता असून तुम्ही ५ करोड रुपये नांदेडहून सुरतला पाठवा, असे सांगितले. व्यावसायिकाला संशय आल्याने त्यांनी खात्री करण्यासाठी पुण्यातील ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे फिर्यादींनी स्पष्ट केले. यासोबतच आणखी ९ जणांना पैश्यांची मागणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणानंतर फिर्यादींनी ऑडिओ क्लिपद्वारे भारतातील व्यापाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी अनोळखी मोबाईल क्रमांकाविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.