आजाराला कंटाळून वयोवृद्ध महिलेने संपवलं जीवन; बारामतीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 11:41 AM2022-10-04T11:41:28+5:302022-10-04T11:41:38+5:30
वयोवृद्ध महिला शुगर व ब्लड प्रेशरच्या आजाराने ग्रासलेल्या होत्या
सांगवी (बारामती): आजाराला कंटाळून एका ७८ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे.
याबाबत मुलगा लक्ष्मण जगन्नाथ कोळेकर (वय ४०) रा. शिंगाडे वस्ती म्हसोबावाडी,मानपावस्ती (ता.बारामती जि. पुणे) यांनी माळेगाव पोलिसांत खबर दिली आहे. पोलीस नाईक विशाल गजरे यांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रभागा जगन्नाथ कोळेकर (वय ७८) रा. शिंगाडेवस्ती म्हसोबावाडी, मानापावस्ती (ता. बारामती जि. पुणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.
आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध महिला शुगर व ब्लड प्रेशरच्या आजाराने ग्रासलेल्या होत्या. या आजारामुळे त्या सतत मानसिक तणावात होत्या. आजाराच्या वेदना असह्य झाल्याने चंद्रभागा कोळेकर यांनी सोमवार (दि.३) रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या पूर्वी राहत्या घरी पत्र्याच्या शेडच्या अँगलला गळफास घेतला. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माळेगाव पोलीस ठाण्याच्या अधिपत्याखालील पाच दिवसांतील ही दुसरी आत्महत्या असून,(२९ सप्टेंबर )रोजी कर्हावागज ,(ता. बारामती) येथील एका अल्पवयीन मुलाने आईने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याच्या नैराश्यतून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ आत्महत्येची ही दुसरी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.