Pune Crime: गांजाच्या तस्करीत चक्क अभियंता! २७ किलो गांजासह तिघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 10:29 AM2024-02-15T10:29:48+5:302024-02-15T10:30:19+5:30
त्यांच्याकडून २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे....
पुणे : धुळ्याहून गांजा विक्रीसाठी आलेल्या अभियंता तरुणासह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज भागातून अटक केली. त्यांच्याकडून २७ किलो ३२५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
हरिओम संजय सिंग (२१, रा. धुळे), करण युवराज बागुल (२३, रा. शिरपूर जि. धुळे) आणि वसंत सुभाष क्षीरसागर (रा. आंबेगाव, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिंग आणि त्याचा साथीदार बागुल कात्रज भागात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि पथकाला मिळाली.
सापळा लावून त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार लाख ८४ हजार रुपयांचा २७ किलो गांजा, दोन मोबाइल जप्त केले. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, विशाल शिंदे, पांडुरंग पवार, मारुती पारधी, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे आणि रेहना शेख यांनी ही कारवाई केली.