पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने आयटी कंपनीत काम करणाऱ्याला 2 लाख 69 हजार रुपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:08 PM2022-08-06T12:08:13+5:302022-08-06T12:09:41+5:30
पुण्यातील फसवणुकीची घटना...
पुणे : पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीलाच सायबर चोरट्यांनी 2 लाख 69 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी मोरे वस्ती रोड मांजरी येथील 40 वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 21 जानेवारी रोजी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, फिर्यादी हे एका आयटी कंपनीत काम करतात. सायबर चोरट्याने फिर्यादींना मेसेज करून तो बँकेमार्फत बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर पॅनकार्ड अपडेट करण्याचे सांगून एक लिंक पाठवली. फिर्यादींना बँकेचे काम असल्याचे वाटल्यामुळे त्यांनी दिलेली लिंक क्लिक करून बँक खात्याची गोपनीय माहिती व क्रमांक सायबर चोरट्याला दिला.
त्या माहितीच्या आधारे चोरट्याने फिर्यादीच्या बँक खात्यातून 2 लाख 69 हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खेडेकर करीत आहेत.