इंदापूर परिसरात अतिदुर्मिळ पाणमांजराला ७ तासानंतर विहिरीतून काढले बाहेर
By श्रीकिशन काळे | Published: November 10, 2024 06:01 PM2024-11-10T18:01:31+5:302024-11-10T18:02:01+5:30
अत्यंत दुर्मीळ असे युरेशियन ऑटर हे जंगली भागातील ओढे व काही नद्यांमध्ये आढळून येते
पुणे : इंदापूर परिसरातील एका खेड्यातील विहिरीत दुर्मिळ असे पाणमांजर अडकून पडले होते. त्या पाणमांजराला दौंड येथील इको-रेस्क्यू पथकाने सुखरूप बाहेर काढले आणि पुण्यातील रेस्क्यू उपचार केंद्रात पाठविले. त्यावर उपचार करून पुन्हा अधिवासात सोडण्यात येणार आहे. तब्बल ७ तासानंतर या पाणमांजराला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.
इंदापूरवनविभागातील कर्मचाऱ्यांना पाणमांजर (Otter) विहीरीत पडल्याची माहिती मिळाली होती. वनविभागाचे कर्मचारी आनंद हुकिरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व दौंड येथील पथकाला पाचारण केले. पाणमांजराचे अस्तित्व १९९० ला शेवटी उजनी पाणलोट क्षेत्रात आढळून आल्याचे सांगण्यात येते, पण मागील अनेक वर्षात या जातीचे मांजर कोणाच्याही निदर्शनात आले नव्हते. ज्या विहिरीत हे पाणमांजर पडले होते, या गावाजवळ उजनी तसेच नीरा नदीचे पाणलोट क्षेत्र काही अंतरावर आहे. मात्र यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे आजूबाजूचे सगळे कॅनॉल व ओढे वाहत आहेत. विहिरीपासून १ किमी परिसरातून मोठा कॅनॉल गेला आहे. कदाचित या प्राण्याचा अधिवास आज देखील या भागात दिसून येत आहे.
भारतात पाणमांजराच्या तीन प्रमुख प्रजाती सापडतात. त्यातील अत्यंत दुर्मीळ असे युरेशियन ऑटर हे जंगली भागातील ओढे व काही नद्यांमध्ये आढळून येते. हेच उरेशियन पाणमांजर तालुक्यातील निमगाव केतकी गावाजवळील गोतंडी या गावात विहीरीत पडल्याचे आढळून आले.
दौंड येथील इको रेस्क्यू पथकाचे प्रमुख नचिकेत अवधानी व डॉ. श्रीकांत देखमुख यांनी युरेशियन ऑटर पाणमजर प्रजातीचे प्राणी आहे, हे लक्षात आल्यावर पाण्यात पोहण्यासाठी तरबेज असलेल्या प्राण्याला पकडण्यासाठी पाण्यात पिंजरा सोडून ३ तास वाट पाहिली. तरी देखील पाणमांजर काही पिंजऱ्यात येईना, शेवटी पिंजऱ्यात खाद्य ठेऊन देखील पुढील काही तास पाणमांजर पिंजऱ्याजवळ येत नव्हते. शेवटी थोडा अंधार पडला आणि त्याच वेळी भूक लागल्यामुळे पाणमांजर पिजऱ्यात आले. ७ तास सलग प्रयत्न करुन या अति दुर्मिळ व लाजाळू पाणमांजराला पकडण्यात यश आले.
प्राथमिक तपासणी केल्यावर विहीरीत अडकून पडल्यामुळे या पाणमांजराला काही जखमा झाल्याचे समोर आले.
या संपूर्ण रेस्क्यू मध्ये वनविभागाचे इंदापूर विभागाचे कर्मचारी मिलिंद शिंदे, शुभम कडू, शुभम धायतोंडे, अनंत हुकिरे तसेच इको रेस्क्यू पथकाचे नचिकेत अवधानी, डॉ. श्रीकांत देखमुख, प्रशांत कौलकर तसेच स्थानिक पर्यावरण प्रेमी फ्रेड्स ऑफ नेचर क्लबचे वैभव जाधव देखील उपस्थित होते.