दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा सुपारी देऊन केला खून, बारामतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 07:45 PM2023-09-01T19:45:37+5:302023-09-01T19:45:50+5:30
मुलाच्या मृतदेहाला दोरी आणि मोठे दगड बांधून विहिरीत फेकून दिले होते
बारामती : दारु पिऊन त्रास देणाऱ्या पोटच्या मुलाचा वयोवृध्द मजुर दांपत्याने सुपारी देऊन खुन केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मजुर दांपत्य , सुपारी घेवुन खुन करणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी एका ३०ते ४० वयोगटातील अनोळखी युवकाचा निर्घृण खुन करुन त्याचा मृतदेह रस्सी व तारेने मोठे दगड बांधुन शिर्सुफळ (ता बारामती) येथील पाण्याच्या तलावात फेकुन दिला होता. त्यानंतर दाखल झालेल्या या गुन्ह्याचा शोध तालुका पोलिसांचे तपास पथक हे आजुबाजुच्या गावात घेत होते. याच दरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत रावणगाव (ता दौंड) येथील कुटंबाबाबत माहिती मिळाली. पोपट भानुदास बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई पोपट बाराते व मुलगा सौरभ पोपट बाराते हे गावातुन गेल्या ३ महिन्यापूर्वी अचानक गायब झाले होते. त्यानंतर १५ दिवसांनी केवळ बाराते दांपत्यच गावातील घरी परत आले आहेत. मात्र, मुलगा सौरभ हा त्यांचे सोबत आला नसल्याची खात्रीशीर माहीती माेरे यांना मिळाली. पोलीसांनी शुक्रवारी( दि ३१) पोपट बाराते याच्याकडे मुलगा सौरभ व पत्नी मुक्ताबाई यांचे ठावठिकाण्याबाबत विचारणा केली. यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मला काही माहीत नाही ,माझ्या पत्नीला विचारा असे सांगितले. त्यावर पोलिसांनी बाराते दांपत्याची मुलगी निलम खुरंगे (रा खुरंगेवाडी ता कर्जत जि अहमदनगर ) हीच्याकडे गेलेल्या मुक्ताबाई बारातेचा शोध घेतला. यावेळी मुक्ताबाईने पोलिसांनी केलेल्या चाैकशीत मुलगा सौरभ मला दारु पिऊन येऊन मला मारहाण करुन मला व माझे पती पोपट यांना त्रास देत होता. त्यामुळे गावातील बबलु तानाजी पवार याला मुलगा सौरभला जिवे ठार मारण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयेची सुपारी दिली होती. त्यानुसार बबलु याने त्याचे मित्र बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे, अक्षय चंद्रकांत पाडळे असे मिळुन तिघांनी सौरभ यास ठार मारल्याची कबुली दिली. त्याचा मृतदेह शिर्सुफळ येथील तलावमध्ये दगड बांधुन टाकुन दिल्याचे देखील सांगितले. त्यानंतर गुन्हयातील आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.