एका दिवसात तब्बल १ कोटी ८९ लाखांचे उत्पन्न; पीएमपीने १३ लाख प्रवाशांचा प्रवास
By नितीश गोवंडे | Published: September 14, 2022 06:28 PM2022-09-14T18:28:10+5:302022-09-14T18:28:35+5:30
पीएमपीचे उत्पन्न असेच टिकून ठेवायचे असेल तर अधिकाऱ्यांच्या नेहमी होणाऱ्या बदल्या, राज्य सरकारसह दोन्ही महापालिकांकडून झालेले दुर्लक्ष याकडे देखील गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे
पुणे : कोरोना काळानंतर घटलेली पीएमपीची प्रवासी संख्या आता पूर्ववत होत आहे. गेल्या सात वर्षांनंतर पहिल्यांदाच सोमवारी (दि. १२) १३ लाख प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केला. यामुळे एकाच दिवशी १ कोटी ८९ लाखांचे उत्पन्न पीएमपीला मिळाले.
कोरोना काळात सगळ्यात जास्त फटका पीएमपीला बसला होता. त्यातच कधीही सक्षम अधिकारी दिला गेलेला नसताना, पीएमपीचे जून्या आणि ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण लक्षात घेता प्रवाशांनी अन्य खासगी वाहनांकडे आपला मोर्चा वळवला होता. २०१५ साली पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या सरासरी १२ ते १३ लाख एवढी होती. त्यानंतर सात वर्ष मात्र एवढे प्रवासी पीएमपीला मिळालेच नव्हते. अखेर सोमवारी एकाच दिवशी १३ लाख प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केल्याने भविष्यात पीएमपीला नक्कीच चांगले दिवस येतील अशी आशा दिसून येत आहे.
सध्या १ हजार ६३४ पीएमपीने सरासरी १० लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. या उत्पन्नामध्ये दैनिक, मासिक आणि वार्षिक पासद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. सध्या पीएमपी पास धारकांची संख्या देखील वाढत असल्याने सोमवारी मिळालेल्या उत्पन्नातून २५ लाख ३७ हजार ८४० रुपयांचे उत्पन्न हे पास विक्रीतून मिळाले होते. पीएमपीचे उत्पन्न असेच टिकून ठेवायचे असेल तर अधिकाऱ्यांच्या नेहमी होणाऱ्या बदल्या, राज्य सरकारसह दोन्ही महापालिकांकडून झालेले दुर्लक्ष याकडे देखील गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.