सराईत गुन्हेगारावर कोयत्याने वार करून खून, येरवड्यातील घटना
By नितीश गोवंडे | Published: July 17, 2024 04:00 PM2024-07-17T16:00:47+5:302024-07-17T16:00:56+5:30
खून करून पसार झालेल्या तीन्ही आराेपींना येरवडा पोलिसांनी अटक केली
पुणे: येरवडा भागात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. १७) मध्यरात्री घडली. खून करून पसार झालेल्या तीन्ही आराेपींना येरवडा पोलिसांनीअटक केली.
सुधीर उर्फ बाळू चंद्रकांत गवस (२३, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य (४४), स्वप्नील प्रवीण आचार्य (२८) आणि रवीकिरण रामचंद्र आचार्य (३५, तिघे रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली. सुधीर गवस याचा आचार्य यांच्याशी वाद झाला होता. गवस याच्यावर मारहाणीसह गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे येरवडा पोलिस ठाण्यात दाखल आहेत. येरवडा कारागृहातून त्याची काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. मंगळवारी रात्री गवसचा आचार्य कुटुंबीयांशी वाद झाला होता. त्यानंतर गवस पसार झाला होता.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास जयप्रकाश नगर परिसरात गवस थांबला होता. आरोपी प्रवीण, स्वप्नील, रवीकिरण यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आकाश मिनी मार्केटजवळ गवस लपला. आरोपींनी गवसला गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गवसला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल टकले करत आहेत.