दीनानाथ रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:54 IST2025-04-04T15:46:59+5:302025-04-04T15:54:13+5:30
CM Devendra Fadanvis: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेच्या चौकशी संदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दीनानाथ रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital ) प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशाच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली. पैशांअभावी रुग्णालयाने गेटवरुनच गर्भवती महिलेला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार दिले असते तर महिलेचा जीव वाचला असता, असा संताप राज्यभरातून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर कारवाई करा अशी मागणी सुरू आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
या अधिकाऱ्यांचा चौकशी समितीमध्ये समावेश
1) उपसचिव श्रीमती यमुना जाधव,
2) सह कक्षप्रमुख तथा कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी,
3) सर जे. जे. रुग्णालय समूह, मुंबईचे अधीक्षक हे सदस्य असतील तर
4) विधि व न्याय विभागाचे उपसचिव/अवर सचिव हे या चौकशी समितीचे सदस्य सचिव असतील.
'योग्य ती कारवाई होणार…’दीनानाथ रुग्णालयातील दुर्लक्ष प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार थेटच बोलले
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी करण्याची मागणी काल रात्रीपासून सुरू झाली. आज राजकीय पक्षांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आज शिवसेनेकडून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. रुग्णालयाने १० लाख मागितले होते का? याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. योग्य माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत होते. रुग्णालयाच्या बाहेर विविध संघटना, पक्ष एकत्र येऊन आंदोलन केली. दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
प्रसूती वेदना तीव्र झाल्याने महिलेला खासगी गाडीने २५ किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच तिचा मृत्यू झाला.
अधिक माहितीनुसार, भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे १० लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि त्यातच जीव गेला.