जंगली महाराज रस्त्यावरील खचलेल्या चेंबरच्या कामाची चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:08 IST2024-12-19T10:06:43+5:302024-12-19T10:08:18+5:30

नवीन चेंबर बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणी कमी प्रमाणात तुंबले होते.

An inquiry will be conducted into the work of the collapsed chamber on Jangli Maharaj Road. | जंगली महाराज रस्त्यावरील खचलेल्या चेंबरच्या कामाची चौकशी होणार

जंगली महाराज रस्त्यावरील खचलेल्या चेंबरच्या कामाची चौकशी होणार

पुणे : जंगली महाराज रस्त्यावर गेल्या ३० वर्षांत एकदाही खड्डा पडलेला नाही. पण, याच रस्त्यावर पाच वर्षांपूर्वी केलेले चेंबर खचून मोठा खड्डा पडला होता. एवढ्या कमी कालावधीत हा चेंबर खचला कसा, याची चौकशी पथ विभागाकडून केली जाणार आहे.

पुणे शहरात पावसाळ्यात अनेक रस्त्यांना खड्डे पडतात. पण, महापालिकेने सुमारे ३० वर्षांपूर्वी जंगली महाराज रस्त्याचे काम करताना त्याच्या कामाच्या गुणवत्तेकडे तत्कालीन अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याने या रस्त्याला खड्डे पडत नाहीत. पण, गेल्या काही वर्षांपासून जंगली महाराज रस्त्यावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने येथील पावसाळी गटारांची क्षमता वाढविणे, नवीन चेंबर बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणी कमी प्रमाणात तुंबले होते.

छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या समोरच्या बाजूस जंगली महाराज रस्त्यावर पावसाळी गटाराचे चेंबर खचले होते. मनसेचे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तेथे मोठे भगदाड पडण्याची शक्यता होती. पण, हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अपघात होण्यापासून वाचला आहे.

जंगली महाराज रस्त्यावर हा चेंबर सुमारे ५ वर्षांपूर्वी केलेला आहे. पण, तो एवढ्या लवकर कसा काय खचला, मोठी पोकळी कशी निर्माण झाली, याची चौकशी केली जाईल. संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. - अनिरूध्द पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका 

Web Title: An inquiry will be conducted into the work of the collapsed chamber on Jangli Maharaj Road.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.