देवाची उरूळी व फुरसुंगी येथील कचरा डेपोतील लिचेडप्रकरणी होणार चौकशी
By निलेश राऊत | Published: March 1, 2024 08:17 PM2024-03-01T20:17:29+5:302024-03-01T20:17:43+5:30
कचरा डेपोमध्ये कचरा कुजल्याने तयार झालेल्या लिचेडमुळे परिसरातील जलस्त्रोत दुषित होत असल्याच्या तक्रारी
पुणे: देवाची उरूळी व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये वर्षानुवर्षे साठणारा कचरा कुजल्याने, त्यातून तयार झालेल्या लिचेडवर (काळा द्रवरूप पदार्थ) योग्य प्रक्रिया केली गेली नसल्याचे समोर आले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले खुलासेही समाधानकारक नसल्याने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
शहराच्या विविध भागातून गोळा होणारा कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यात ओला कचरा व सुका कचरा वेगळा केला जातो. मात्र यामध्ये प्रक्रिया होऊ न शकणारा अशा कापड, गाद्या-उशा, काच, चिनी मातीच्या वस्तू, राडारोडा या वेगळ्या करून त्यावर देवाची उरूळी येथील कचरा डेपोत शास्त्रोक्त पद्धतीने लँडफिलिंग करण्यात येते. परंतु, हे काम नोव्हेंबर, २०२० पासून बंद आहे. महापालिका आयुक्तांनी कचरा डेपोची नुकतीच पाहणी केली असता, या बंद कामामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तात्काळ हे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान कचरा डेपोमध्ये कचरा कुजल्याने तयार झालेल्या लिचेडमुळे परिसरातील जलस्त्रोत दुषित होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. लिचेडवर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराला प्रति लिटर पावणे दोन रूपये शुल्क महापालिका देते. याबाबतची बीलेही संबंधित ठेकेदाला वेळेवर अदाही होत आली. पण शास्त्रोक्त पध्दतीने यावर प्रक्रिया होत नसल्याचे निदर्शनास आल्याने, या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर दंड आकारणी करून, लिचेड प्रक्रियेसाठी देण्यात आलेले पैसे परत घेण्यात येणार आहे. तसेच त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल असे डॉ.खेमनार यांनी सांगितले.
कोथरूड डेपोमधील लिचेडचा वाहनचालकांना त्रास
कोथरूड कचरा डेपो बंद झाला असला तरी, तेथे कचरा हस्तांतरणाचे काम सुरू असते. यामध्ये कचरा गाड्यांमधील तसेच रॅम्पवरील लिचेड अवकाळी पावसामुळे लगतच्या रस्त्यावर येते. त्यामुळे येथे दुचाकी घसरण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. याबाबत डॉ. खेमनार यांना विचारले असता त्यांनी, कचरा वाहतुक करणाऱ्या गाड्यांमधून तसेच रॅम्पवरून लिचेड रस्त्यावर येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी योग्य ते उपाययोजना केल्या जातील असे सांगितले.