नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभविण्याची पुणेकरांना संधी
By श्रीकिशन काळे | Published: July 9, 2024 02:58 PM2024-07-09T14:58:55+5:302024-07-09T14:59:15+5:30
'सिझन' बरोबरच रत्ना पाठक शाह यांचा अभिनय असलेले 'ओल्ड वर्ल्ड' हे नाटक पुणेकरांच्या भेटीला
पुणे: येत्या बुधवारी दि २३ जुलै ते रविवारी दि. २८ जुलै दरम्यान पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या इमारतीत असलेल्या श्रीराम लागू रंग अवकाश येथे ख्यातनाम अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभवण्याची पर्वणी पुणेकर नाट्यरसिकांना उपलब्ध होणार आहे. या सीझन अंतर्गत नसीरुद्दिन शाह व सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक- शाह यांचा अभिनय असलेले आणि मॉटले प्रॉडक्शन प्रस्तुत 'ओल्ड वर्ल्ड' हे नाटक पुणेकरांच्या भेटीला येत असल्याची माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.
याबद्दल अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले, “ओल्ड वर्ल्ड हे नाटक रशियन नाटककार अलेक्सई अर्बुझोव्ह यांनी लिहिलेले नाटक असून अर्घ्य लाहिरी यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक-शाह यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका असून नसीरुद्दीन शाह सीझन अंतर्गत दि २३ जुलै ते २६ जुलै रोज एक तर २७ व २८ जुलै रोजी या नाटकाचे प्रत्येकी दोन प्रयोग श्रीराम लागू रंग अवकाश येथे होतील.”
'ओल्ड वर्ल्ड' या नाटकात नसीरुद्दीन शाह यांनी एका अल्पभाषी डॉक्टरची तर रत्ना पाठक शाह यांनी एका विक्षिप्त रुग्णाची भूमिका केली असून हे दोघे एका रुग्णालयात एकमेकांना भेटतात. या नाटकात हलक्याफुलक्या विनोदाद्वारे एकाकीपणाची एक संवेदनशील गोष्ट रसिकांसमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.