कशी झाली भारताची निर्मिती ते पाहण्याची संधी..!
By श्रीकिशन काळे | Updated: January 11, 2025 19:27 IST2025-01-11T19:27:01+5:302025-01-11T19:27:40+5:30
निर्मिती भारतभूमीची हे प्रदर्शन रविवार १२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांना पाहता येईल.

कशी झाली भारताची निर्मिती ते पाहण्याची संधी..!
पुणे : आपली पृथ्वी सात खंडे आणि पाच महासागरांनी व्यापली आहे. आपली भारतभूमी देखील लक्षावधी वर्षांपूर्वी वेगळी होती, वेगळ्या स्थानी होती. तिच्या निर्मितीची कहाणी मनोरंजक व विस्मयकारक असून, त्याची माहिती बालगंधर्व कलादालनात पहायला मिळत आहे. निर्मिती भारतभूमीची हे प्रदर्शन रविवार १२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांना पाहता येईल.
जीविधा संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून समुद्रावर तरंगत भारतीय द्वीपकल्प अनेक दशलक्ष वर्षांचा प्रवास करत उत्तर गोलार्धात आला. प्रवासात पश्चिमघाट, दख्खनचे पठार यांची निर्मिती झाली. हा भूखंड उत्तर गोलार्धातल्या युरेशियन भूखंडाला धडकला आणि दोन भूखंडांमधला टेथिस समुद्र तळासहित वर उचलला गेला तेव्हा हिमालय पर्वतरांगांची निर्मिती झाली. गंगेसारख्या नद्या वाहत्या झाल्या त्यामुळे उत्तरप्रदेशातील मैदानी प्रदेशांची निर्मिती झाली. हा कालपट 350 दशलक्ष वर्षे एवढा विस्तीर्ण आहे. या घटनांतून आजच्या भारताचे भौगोलिक चित्र निर्माण झाले आणि आश्चर्यकारक जैवविविधता निर्माण झाली. याची माहिती सचित्र प्रदर्शनात पाहता येत आहे.
जगातील महाजीविधता असणाऱ्या देशांची यादी बनवली आहे. त्यात फक्त 21 देशांचा समावेश आहे व भारताचा क्रमांक 8 वा आहे. या भूवैज्ञानिक घटनांमुळे भारतात अनेक परिसंस्था तयार झाल्या. तसेच उंची, तपमान, पर्जन्यमान यात प्रचंड विविधता निर्माण झाली. यासर्वाचा परिणाम भारतात मोठ्या प्रमाणात जैवविविधता निर्माण झाली. भारत देशाच्या निर्मितीची ही इंटरेस्टिंग कहाणी जीविधा संस्थेतर्फे बालगंधर्व कलादालनात 9 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित केलेल्या प्रदर्शनात पोस्टर स्वरूपात पहायला मिळत आहे. याशिवाय महत्वाच्या भूवैज्ञानिक घटनांचे माॅडेल्स व अनेक नकाशे ठेवले आहेत.
प्रदर्शनात प्रकाशमान दगड !
प्रदर्शनामध्ये प्रकाशमान दगडही पहायला मिळत आहे. "माय मिनरल्स अर्थ" ने भारतात आढळणारे खडक, खनिजे व फाॅसिल्स यांचा संग्रह प्रदर्शनात ठेवला आहे. डाॅ. हार्दिक सकलेचा यांनी जगभरात फिरून हे खडक, खनिजे संकलित केली आहेत. ते पाहणे अतिशय आनंददायी आहे.