Anant Chaturdashi 2022| पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 05:37 PM2022-09-09T17:37:44+5:302022-09-09T17:42:04+5:30

जवळपास ६ तासानंतर विसर्जन....

Anant Chaturdashi 2022 ganesh visarjan pune updates manacha pahila ganpati kasaba ganpati visarjan | Anant Chaturdashi 2022| पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; पाहा व्हिडिओ

Anant Chaturdashi 2022| पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; पाहा व्हिडिओ

googlenewsNext

-श्रीकिशन काळे

पुणे : पुण्याचा पहिला मानाचा श्री कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी १०.३० मिनिटांनी सुरू झाली. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गणपतीचे विसर्जन करण्यात आले. जवळपास ६ तासानंतर विसर्जन करण्यात आले. यंदा मानाच्या गणपतींनी लवकर मिरवणूक काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु, उलट यंदा उशीर लागत आहे. त्यामुळे मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे विसर्जनाचा वेळ खूपच लांबणार आहे.

वैभवशाली परंपरा असलेला यंदाचा गणेशोत्सव दिमाखात साजरा झाला. मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक देखील जल्लोषपूर्ण वातावरणात झाली. कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव मिरवणूक झाली नव्हती. त्यामुळे यंदाचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत असून, पहिल्या मानाचा ग्रामदैवत कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी १०.३० मिनिटांनी सुरू झाली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजा झाली. ढोलताशांच्या गजरात सर्वांचा उत्साह टिपेला पोहोचला आहे.

कसबा गणपती टिळक चौकात (अलका चौक) दुपारी ३ वाजता आला. या गणपती समोर आर्ट आफ लिव्हिंगचे आरोग्यदायी पथक, कामायनीचे पथक, कलावंत ढोल ताशा पथक, रूजगर्जना पथक, प्रभात स्वर यांनी आपली सेवा बजावली. दरम्यान टिळक चौकात राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने चौकात भलीमोठी रांगोळी काढण्यात आली होती. कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर त्यांचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यंदा प्रथमच कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या हस्ते स्वागत झालेले नाही. दरम्यान, दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरीचे टिळक चौकात आगमन झाले आहे. त्यानंतर तिसरा गुरूजी तालीम गणपती व चौथा तुळशीबाग गणपती आणि पाचवा केसरीवाडा हे लक्ष्मी रस्त्यावर अद्याप तरी आहेत.

Web Title: Anant Chaturdashi 2022 ganesh visarjan pune updates manacha pahila ganpati kasaba ganpati visarjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.