पुण्यातील केवळ ११ टक्के गणेश मुर्तीच फिरत्या हौदात विसर्जित
By निलेश राऊत | Published: September 7, 2022 08:17 PM2022-09-07T20:17:04+5:302022-09-07T20:17:38+5:30
यंदा फिरत्या हौदांची संख्या १५० वर नेण्यात आली...
पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेची पूर्वीची विसर्जन व्यवस्था असतानाही, महापालिकेने यंदा १५० फिरत्या हौद शहरात कार्यरत ठेवले आहेत. मात्र या हौदांमध्ये महापालिकेच्या विविध सेवामार्फत विसर्जित होणाऱ्या गणेश मुर्तींपेकी केवळ ११ टक्के गणेश मुर्ती विसर्जित झाल्या आहेत.
महापालिकेच्यावतीने कोरोना आपत्तीमुळे गतवर्षी ६० फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती. यंदा फिरत्या हौदांची मागणी नसताना ही संख्या १५० वर नेण्यात आली. याकरिता वाढीव दराने म्हणजेच १ कोटी ४१ रुपयांची निविदा मान्य करून संबंधित ठेकेदाराला काम देण्यात आले. परंतु, हे फिरते हौद अनेक ठिकाणी जागीच उभे असल्याचे दिसून आले आहेत.
नागरिकांना घराजवळ गणेश विसर्जन करता यावे व नदी काठावरील गर्दी टाळावी यासाठी हे फिरते हौद शहरात पाचव्या दिवसापासून कार्यरत करण्यात आले आहेत. मात्र हे हौद मोठ्या ट्रकमध्ये असल्याने हे ट्रक शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच वस्त्यांमध्ये जाऊ शकत नाहीत. परिणामी हे ट्रक मुख्य रस्त्यावरूनच फिरत आहेत. तर काही भागात मुख्य चौकांमध्ये थांबून राहत आहेत. यामुळे या फिरत्या हौदांचा उपयोग तरी काय असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
शहरात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत महापालिकेच्या विविध सुविधा यंत्रणामार्फत १ लाख १३ हजार ५३२ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले आहे. यापैकी केवळ १२ हजार ५८७ गणेश मुर्तींचे विसर्जन हे फिरत्या हौदात झाले आहे. तर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या नदी काठच्या बांधलेल्या हौदात १८ हजार २४३ गणेश मुर्तींचे, लोखंडी टाक्यात ६५ हजार ९६२ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले आहे. तसेच मुर्ती संकलन केंद्रांवर १६ हजार ७४० गणेश मुर्तीं संकलित झाल्या आहेत.
जीपीएसद्वारे नियंत्रण कुठे
या सर्व फिरत्या हौदांवर जीपीएस बसविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाने सांगितले होते. त्यानुसार काही हौदांची पाहणी केली असता, फिरत्या हौदाच्या वाहन चालकास अशी काही यंत्रणा आपल्या वाहनावर आहे याचा थांगपत्ताच नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे जीपीएस प्रणाली बसविणे म्हणजे बोलाची कढी बोलाचाच भात असल्याची टीका या प्रणालीवर होत आहे. दरम्यान महापालिकेच्या वतीने ही यंत्रणा कार्यान्वित असून ती वाहनांना ट्रॅक करीत असल्याने चालकांना त्याची माहिती असण्याचे कारण नाही असा खुलासा करण्यात आला आहे.