Anant Chaturdashi 2022| विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्याचा मानाच्या गणपती मंडळांचा मानस

By नम्रता फडणीस | Published: September 7, 2022 09:30 PM2022-09-07T21:30:48+5:302022-09-07T21:30:48+5:30

दोन वर्षांच्या खंडानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज....

Anant Chaturdashi 2022 Respected Ganesha Mandals intend to finish the immersion procession on time | Anant Chaturdashi 2022| विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्याचा मानाच्या गणपती मंडळांचा मानस

Anant Chaturdashi 2022| विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्याचा मानाच्या गणपती मंडळांचा मानस

googlenewsNext

पुणे : निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर आता गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना वेध लागले आहेत वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचे. अनंत चतुर्दशीला अर्थात शुक्रवारी (दि. ९) सकाळी मंडईतील टिळक पुतळा येथून सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

कसबा गणपती मंडळ

ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके असतील. रमणबाग, रुद्रगर्जना आणि कलावंत ही तीन ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. चांदीच्या पालखीमध्ये विराजमान झालेली गणरायाची मूर्ती हे वैशिष्ट्य असून, मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावरून पालखी नेणार आहेत.

तांबडी जोगेश्वरी मंडळ

श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारावादनाचा गाडा आणि न्यू गंधर्व बँडपथक असेल. समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशा पथके तसेच विष्णुनाद हे शंखवादकांचे पथक, पारंपरिक पेहरावातील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये असतील. चांदीच्या पालखीमध्ये विराजमान गणरायाची मूर्ती कार्यकर्ते वाहून नेणार आहेत.

गुरुजी तालीम मंडळ

मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्तिरथातून निघणार आहे. या रथावर फुलांच्या सजावटीसह विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारावादनाचा गाडा असेल. गर्जना आणि नादब्रह्मची दोन पथके अशी तीन ढोल-ताशा पथके वादन करणार आहेत.

तुळशीबाग मंडळ

फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेल्या श्री गजमुख रथामध्ये तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघेल. लोणकर बंधूचा सनई आणि नगारावादन अग्रभागी असेल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त साकारलेला विशेष रथ त्यामागे असेल. स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि गजर ही तीन ढोल-ताशा पथके असतील.

केसरीवाडा गणपती

केसरीवाडा गणपती या मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत बिडवे बंधू यांचा नगारावादनाचा गाडा असेल. श्रीराम, शिवमुद्रा, वज्र या ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे. फुलांनी सजविलेल्या मेघडंबरी रथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान होणार आहे.

अखिल मंडई मंडळ

अमोघ त्रिशक्ती नाग रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक निघेल. विशाल ताजणेकर यांनी रथाचे कलादिग्दर्शन केले असून, विविधरंगी प्रकाशझोतात रथ उजळून निघेल. मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचा सनई-चौघडाचा गाडा, गंधर्व बँड तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह दोन ढोल-ताशा पथके सहभागी होतील.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आलेल्या श्री स्वानंददेश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार आहे. एलईडी व मोत्याच्या रंगाच्या दिव्यामध्ये हा रथ साकारण्यात आला आहे. मिरवणुकीत अग्रभागी देवळणकर बंधू यांचा नगारा, प्रमोद गायकवाड यांचे सनईवादन असेल. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे असलेला आणि स्वच्छतेचा संदेश देणारा जय गणेश स्वच्छता अभियान रथ असणार आहे. स्व-रूपवर्धिनी संस्थेचे पथक, दरबार व प्रभात ही बँडपथके आणि केरळचे चंडा या पारंपरिक वाद्यवादकांचा चमू मिरवणुकीमध्ये असेल.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी

प्रथेप्रमाणे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती रथामध्ये बसून सकाळी 8.30 ते 9 च्या सुमारास मंडई येथे टिळक पुतळ्याच्या येथे विराजमान होते. तेथून पुढे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. परंपरेप्रमाणे या
गणपतीची विसर्जन मिरवणूक सर्वसाधारणपणे रात्री 11.30 वाजता निघणार आहे. श्रीराम, नादब्रम्ह, सर्ववादक, समर्थ प्रतिष्ठान यांची पथके असणार आहेत. याशिवाय शंख वादन आणि मर्दानी खेळ साकारण्यात येणार आहेत.

Web Title: Anant Chaturdashi 2022 Respected Ganesha Mandals intend to finish the immersion procession on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.