Anant Chaturdashi 2022| समन्वयाच्या अभावामुळे पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका लांबल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 03:43 PM2022-09-10T15:43:48+5:302022-09-10T15:44:21+5:30
गणेश विसर्जनाच्या मिरवणुका लांबण्याची कारणे...
पुणे : पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या मिरवणूका अजून (शनिवार) सुरू आहेत. काल (शुक्रवारी) मानाचा पहिला कसबा गणपती साडे दहाच्या सुमारास निघाला. त्यानंतर मागील चार मानाच्या गणपतींच्या मिरवणुका रेंगाळल्या. यंदा मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका विक्रमी लांबल्या आहेत. मानाचा पाचवा गणपती असणारा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन रात्री साडे आठ वाजता पार पडले. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रोड आणि लाल बहाद्दुर शास्त्री रोडवरील गणेश मंडळांना ताटकळत बसावे लागले. अजूनही शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू आहेत. या विसर्जन मिरवणुका आज सायंकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
का लांबल्या मिरवणुका?
शुक्रवारी रात्री बारापर्यंत फक्त १९ मंडळ बेलबाग चौकातून पुढे गेली होती. त्यानंतर रात्री १२ ते सकाळी सहापर्यंत फक्त ८ मंडळ आणि सकाळी सहा ते अत्तापर्यंत १०६ मंडळ बेलबाग चौकातून पुढे गेली होती. यामुळेच लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक लांबल्या होत्या.
पोलिसांच्या नियोजनात अभाव-
पोलीस प्रशासन आणि मंडळं यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळेच यावर्षी विसर्जनाला विलंब झाला, ही बाब मान्य करावीच लागेल, असे मत दगडूशेठचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
यंदा मानाच्या पाचही गणरायांची विसर्जन मिरवणूक बरीच लांबली. कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदा दणक्यात जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पुण्याचा पहिला मानाचा श्री कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी १०.३० मिनिटांनी सुरू झाली. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गणपतीचे विसर्जन करण्यात आले. जवळपास ६ तासानंतर विसर्जन करण्यात आले.
यंदा मानाच्या गणपतींनी लवकर मिरवणूक काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु, उलट यंदा उशीर झाला. त्यामुळे मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे विसर्जनाचा वेळ खूपच लागला. दुसऱ्या मानाच्या तांबडी जोगेश्वरी गणरायाचे विसर्जन ५ वाजून ३६ मिनिटांनी झाले. तिसऱ्या मानाच्या गुरूजी तालीम गणपतीचे विसर्जन सव्वासातच्या सुमारास झाले, तर चौथ्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन पावणे आठ वाजून २ मिनिटांनी झाले. पाचवा केसरीवाडाचे विसर्जन साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाले.