प्राचीन धार्मिक स्थळे भारतीय संस्कृतीचे प्रतिक : गो. बं. देगलुरकर; पुण्यात छायाचित्र प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:47 PM2018-02-12T14:47:25+5:302018-02-12T14:54:40+5:30
स्वहिंदू चॅरीटेबल ट्रस्ट आणि चौधरी यात्रा कंपनी यांच्या वतीने कैलास पर्वत आणि मानससरोवर या विषयी परिपूर्ण माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते झाले.
पुणे : भारतासारख्या देशाला उज्ज्वल आणि समृद्ध धार्मिक पंरपरेचा वारसा लाभलेला आहे. हा वारसा प्रत्येक भारतीयाने अनुभवण्यासारखा असून ही प्राचीन धार्मिक स्थळे भारतीय संस्कृतीचे प्रतिके आहेत. त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असे मत डेक्कन अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केले.
स्वहिंदू चॅरीटेबल ट्रस्ट आणि चौधरी यात्रा कंपनी यांच्या वतीने कैलास पर्वत आणि मानससरोवर या विषयी परिपूर्ण माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वहिंदू ट्रस्टचे सुनील सोनवणे, चौधरी यात्रा कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश चौधरी आणि संचालक ब्रिजमोहन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कैलास पर्वत आणि मानसरोवर परिसरात अनेक धर्मियांची श्रद्धा असलेली विविध ठिकाणे आहेत. चीऊगोम्पा, मानसरोवर, राक्षसताल, यमव्दार, अष्टपाद पर्वत, गणेश पर्वत, शिवस्थळी, गणेश कुंड, गौरीकुंड अशा विविध स्थळांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून करुन देण्यात येणार आहे. अध्यात्मिक अनुभुती देणाऱ्या कैलास आणि मानस सरोवराविषयीची भाविकांची जिज्ञासा या प्रदर्शनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे.
डॉ. गो. बं. देगलुरकर म्हणाले, की देशाटन केल्याशिवाय बुद्धधीला धार प्राप्त होत नाही. माता सृजनशील आहे तसेच नदी देखील पाण्याद्वारे अनेकांना सजीवता देत असते म्हणून भारत हा एकमेव देश आहे ज्या देशात नदीला मातेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील प्राचीन मंदिर, मूर्ती या उत्तम स्थापत्याचा नमुना आहेत. या उज्वल स्थापत्यावर आधारित अनेक साहित्य वाचनासाठी उपलब्ध आहे. पंरतु ते प्रत्यक्ष अनुभवणे ही वेगळी अनुभूती आहे. केवळ मौज मजा आणि खरेदी म्हणजे पर्यटन नसून, अध्यात्मिक पर्यटन हा खूप खोलात आणि गांभीर्याने घेण्यासाराखा विषय आहे. अध्यात्मिक पर्यटनाव्दारे भेटी दिल्या जाणा-या स्थळांमधील अध्यात्मिक लहरी, तेथील निरव शांतता, तेथील अध्यात्मिक वातावरण हा अनुभुतीचा भाग आहे.
स्वहिंदू ट्रस्टचे सुनील सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर चौधरी यात्रा कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानत अध्यात्मिक पर्यटन आयोजनामागची भूमिका विशद केली. हे प्रदर्शन दि. १५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.