...अन् अवतरले शिवार, शिवार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:14 AM2017-12-11T03:14:09+5:302017-12-11T03:14:19+5:30

निघोजे येथील शिवार साहित्य संमेलनातून अस्सल ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले. केवळ शिवारातच हे संमेलन झाले नाही, तर ग्रामीण संस्कृतीतील प्रत्येक घटकाचा अनुभव दिला. कांदा, मुळा, मिरचीचा ठेचा, पिठलं, भाकरी, वांग्याचे भरीत, लाप्शी अशा भोजनाचा आनंद दिला तर ग्रामीण जेवणाबरोबर रानमेवा साहित्य रसिकांना मिळाला.

 ... and the Avatarale Shivar, Shivar Sahitya Sammelan | ...अन् अवतरले शिवार, शिवार साहित्य संमेलन

...अन् अवतरले शिवार, शिवार साहित्य संमेलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : निघोजे येथील शिवार साहित्य संमेलनातून अस्सल ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडले. केवळ शिवारातच हे संमेलन झाले नाही, तर ग्रामीण संस्कृतीतील प्रत्येक घटकाचा अनुभव दिला. कांदा, मुळा, मिरचीचा ठेचा, पिठलं, भाकरी, वांग्याचे भरीत, लाप्शी अशा भोजनाचा आनंद दिला तर ग्रामीण जेवणाबरोबर रानमेवा साहित्य रसिकांना मिळाला. साहित्यात ग्रामसंस्कृती कशी अवतरली याचे दर्शन घडले.
शेतकºयांना खºया अर्थाने जगण्याचे बळ मिळावे म्हणून या शिवार संमेलनाचे आयोजन केले होते. पिंपरी-चिंचवड शहराच्या लगतच निघोजे हे गाव असून, तेथील आमराईत हे संमेलन रंगले. संमेलनात बैलगाडी, शेतीची अवजारे, औतकाठी, गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या असे ग्रामीण संस्कृतीतील विविध घटकही येथे होते. त्यामुळे शिवाराची अनुभूती दिली.
पहिल्या सत्रात वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकºयांना जगण्याचे बळ देणारे कविसंमेलन होणार असून, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे यांच्यासह संदीप जगताप, भरत दौंडकर, दुर्गेश सोनार, नारायण पुरी, तुकाराम धांडे, चंद्रकांत वानखेडे, अरुण पवार, कविता कडलक आदी कवी सहभागी झाले होते. त्यांनी शेत शिवारावरील विविध कविता सादर केल्या. शिवार टिकविण्यासाठी काय करण्याची गरज आहे, हे सांगितले. दुसºया सत्रात शिक्षणमंडळाचे माजी सभापती नाना शिवले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसंस्कृती लोप पावत चालली आहे काय? या विषयावर परिसंवाद झाला. आप्पा खोत व संजय कळमकर यांचे कथाकथन झाले.

सोमनाथ पाटील, तुकाराम गवारी यांचा सत्कार

शेवटच्या सत्रात डॉ. डी. वाय़ पाटील विद्यापीठाचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांची सिनेट सदस्यपदी निवड झाली. त्यानिमित्ताने विशेष सन्मान करण्यात आला. मोहन थोरात, तुकाराम गवारी यांचा गौरव कृषिनिष्ठ उद्योजक म्हणून सत्कार केला. तसेच भागूजी येळवंडे, विठोबा पानसरे, ज्ञानेश्वर येळवंडे, गोविंद येळवंडे, निवृत्ती येळवंडे, हिरामण शिंदे, चंद्रकला येळवंडे, बायडाबाई कुºहाडे, विठ्ठल येळवंडे, महादू येळवंडे, पांडुरंग बेंढाळे, ज्ञानेश्वर मराठे, हरिभाऊ गायकवाड, साहेबराव कड, कमल कड, अंजना गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

गावे टिकविणे संघर्ष : पोपटराव पवार

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पूर्वीची गावे टुमदार होती, आंब्याचा मळा, कवठांचा मळा, जांभळांचा मळा होता. झाडाच्या नावाने मळे असायचे. ही ओळख बदलली आहे. जुन्या माणसांनी गावं जिवंत ठेवली होते. नव्या पिढीने वाट लावली आहे. चावडीवरच सर्व तंटे सुटायचे. पोलीस आणि कोर्टाची पायरी माहीत नव्हती़ मात्र, आता चित्र बदलले आहे. गावे टिकविणे मोठा संघर्ष आहे, असे मत शिवार साहित्य संमेलनात हिवरेबाजारचे सरपंच व आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी व महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखा यांच्या वतीने निघोजे येथील आंब्याच्या वनात एकदिवशीय साहित्य संमेलन झाले. त्या वेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि साहित्य संमेलन चिपळूणचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ कविवर्य प्रा. फ. मुं. शिंदे, स्वागताध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच राहुल फडके, मसापचे अध्यक्ष मुरलीधर साठे, संयोजक पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘पूर्वी गावे मोठी होती. ग्रामपंचायत सक्षम होती. आता गावे सक्षम करायची असेल तर ग्रामपंचायती सक्षम करायला हव्यात. गावांतील तरुणांनी ग्रामविकासाचा वसा घ्यायला हवा. गावे टिकविण्याचा संघर्ष आहे. गामसंस्कृती जपायला हवी.’’
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, ‘‘शिवार टिकले तर संस्कृती टिकेल. मराठीचा पाया भक्कम आहे. कवी, साहित्यिक यांचा खरा गुरू शिवार आहे. साहित्य आणि शिवाराचे नाते आहे. भाषा ही शब्दांच्या अंगाने फुलली जाते. सामाजिक जीवनात शिवाराचा आनंद अनेक साहित्यिकांनी साहित्यातून दिला आहे. त्यामुळे शिवार टिकणे, ग्रामसंस्कृती टिकणे गरजेचे आहे.’’
सुदाम भोरे, मुकुंद आवटे, रोहित खर्गे, डॉ. अनु गायकवाड, जयवंत भोसले, बाजीराव सातपुते यांनी संयोजन केले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title:  ... and the Avatarale Shivar, Shivar Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे