...आणि चंद्रकांत दळवी क्षणभर भावुक झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:35 PM2018-03-23T19:35:49+5:302018-03-23T19:35:49+5:30
‘‘जेव्हा चांगलं काम करायचं असतं, तेव्हा १० ते ६ एवढाच वेळ देऊन जमत नाही, तर अधिकच्या कामासाठी कायम घराबाहेर राहावं लागतं.
पुणे : विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आपल्या ३५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांचा यानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी आपल्या पत्नीने दिलेल्या साथीबद्दल बोलताना ते क्षणभर भावुक झाले. कुणीतरी काहीतरी त्याग केल्याशिवाय कुणालातरी काम करता येत नाही, असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी ‘मॅडमने त्याग केला म्हणून मी काम करू शकलो,’ असे प्रांजळपणे मान्य केले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते दळवी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मानपत्र व पुष्पगुच्छ, असे सत्काराचे स्वरूप होते.
या वेळी दळवी म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींचे काम फार अवघड असते. त्यांना खूप मेहनत करावी लागते व पाच वर्षांनी परीक्षाही द्यावी लागते. परीक्षेत ३५ टक्क्यांनी पास होऊनही जमत नाही, तर पहिल्या श्रेणीत पास व्हावे लागते. आपण लोकशाहीचा भाग आहोत, हे एकदा स्वीकारले, की लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यातील काम वेगाने होते.’’
या वेळी दळवी यांनी, पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील पहिल्या क्रमांकाची जिल्हा परिषद असून, विविधतेने नटलेला हा जिल्हा आहे. मी अहमदनगर जिल्हा परिषदेत ४ वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले असून, ३५ वर्षांच्या सेवेत येथे काम करताना जास्त आनंद झाल्याचे मान्य केले. कारण, जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे. येथे या वर्षी बजेटमध्ये एक प्लॅन करता येतो. पुढच्या ६ महिन्यांत त्याचा आराखडा करून पुढील वर्ष-दोन वर्षांत ते काम डोळ्यासमोर उभे राहते. असा आनंद कुठेच मिळत नाही.
या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचा उल्लेखच ‘पद्माताई’ असा करून, ‘‘जेव्हा चांगलं काम करायचं असतं, तेव्हा १० ते ६ एवढाच वेळ देऊन जमत नाही, तर अधिकच्या कामासाठी कायम घराबाहेर राहावं लागतं. मला घराच्या बाहेर राहायचं हे स्वातंत्र्य मिळालं म्हणून मी हे काम करू शकलो. कारण, पद्माने मला मोठी साथ दिली. त्या घरात शून्य प्रलंबितता ठेवतात; मी बाहेर ठेवतो,’’ असे सांगत असतानाच ते काही क्षण भावुक झाले.
०००