...आणि सायकलवरून निघाली ‘पर्यावरण वाचवा’ची विज्ञानवारी!
By admin | Published: March 5, 2017 04:12 AM2017-03-05T04:12:38+5:302017-03-05T04:12:38+5:30
सन २०१०मध्ये रात्रपाळीला जाताना त्यांचा अपघात झाला. हात, पाय, कंबर व पाठीचे मणकेदेखील या अपघातात मोडले. पाठीत दोन स्टिल पट्ट्या, पाच स्क्रू टाकून शस्त्रक्रिया केली.
- अशोक खरात, खोडद
सन २०१०मध्ये रात्रपाळीला जाताना त्यांचा अपघात झाला. हात, पाय, कंबर व पाठीचे मणकेदेखील या अपघातात मोडले. पाठीत दोन स्टिल पट्ट्या, पाच स्क्रू टाकून शस्त्रक्रिया केली. नंतर ते १० महिने घरात पडून होते. नंतरचे ३ वर्षे जमिनीवर बसता येत नव्हते. अखेर १ वर्षानंतर वॉकर व काठी, मग लेडिज सायकलने कामाला जाऊन स्थिरावलेला भोसरी (पुणे) येथील अवलिया आज ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश सायकलवरून भ्रमण करत देत आहे.
प्रकाश काशीराम पाटील (वय ६०) असे त्या विज्ञानप्रेमीचे नाव असून, नुकत्याच खोडद येथे झालेल्या विज्ञानदिनानिमित्त ते भोसरी ते खोडद (ता.जुन्नर) असा एका दिवसाचा १५५ कि.मी. सायकल प्रवास करून त्यांनी जीएमआरटीमधील विज्ञान प्रदर्शनात आलेल्या विज्ञानप्रेमींना ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश जीएमआरटीच्या परिसरात २ तास सायकलिंग करून दिला. आतापर्यंत त्यांनी १६ हजार किलोमीटर सायकलवरून प्रवास केला आहे.
या वेळी जीएमआरटीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व विज्ञानप्रेमींनी प्रकाश पाटील यांचे या सायकल अभियानाचे कौतुक केले. दररोज सायकल चालविण्याचा छंद जोपासला. त्यामुळे कोणतच अंतर पाटील यांना लांब वाटलं नाही. २०१३ व २०१४मध्ये दक्षिण भारत दोन वेळा सायकलप्रवास करून धनुष्येकोडी, रामेश्वरमपर्यंत ‘बेटी बचाव’ अभियान करून एक माणुसकीचा अनोखा संदेशदेखील दिला. त्याच सायकलने तिरुपती बालाजी, हंपीचा प्रवास केला. नंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी या राज्यांचाही सायकलवरून प्रवास केला.
‘पर्यावरण बचाव’ व ‘बेटी बचाव’चां संदेश देताना सायकलवर त्या आशयाचे लोगो व स्टिकर्स लावले आहेत व परिधान केलेल्या कपड्यांवर इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा, बेटी वाचवा असे संदेश लिहिलेले आहेत.