आणि विमाही मिळाला
By admin | Published: July 31, 2015 03:49 AM2015-07-31T03:49:55+5:302015-07-31T03:49:55+5:30
माळीण दुर्घटनेत मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना मिळणारा विद्यार्थी विमा लालफितीच्या कारभारात अडकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग खडबडून जागे झाले
माळीण दुर्घटनेत मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना मिळणारा विद्यार्थी विमा लालफितीच्या कारभारात अडकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी आज माळीणमध्ये जाऊन १६ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना चेकचे वाटप केले.
अपघातग्रस्त विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी शालेय विद्यार्थी अपघात विमा ही योजना आहे. अपघातात मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना ७५ हजार रुपये मिळतात. माळीण दुर्घटनेत २८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यातील २४ विद्यार्थ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिला होता. यातील ७ वारसांना हा विमा मिळाला होता. ३ विद्यार्थ्यांचे वारस निश्चित होत नसल्याने त्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते.
‘लोकमत’ने ही बाब जिल्हा परिषदेच्या शिक्षणअधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर फाईलची शोधाशोध सुरू झाली आणि फक्त ७ विद्यार्थ्यांच्या वारसांना ही रक्कम वाटप झाल्याचे समोर आले. २२ जुलै रोजी यासाठी रक्कम शिक्षणअधिकाऱ्यांच्या खात्यात जमाही झाली होती. मात्र, ३0 जुलै रोजी माळीण दुर्घटनेला वर्ष होत असल्याचे स्मरण करून दिल्यानंतर शिक्षण अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना चेक तयार करण्याचे आदेश दिले. आणि आज हे चेक त्यांच्या वारसांना देण्यात आले.
आज जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कांतीलाल उमाप स्वत: हे १६ चेक घेऊन माळीणला गेले होते. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, मी तेथे या चेकचे वाटप करणार होतो; मात्र तेथील वातावरण पाहता त्या व्यासपीठावर ते देणे योग्य वाटले नाही. म्हणून आंबेगावच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे ते चेक देऊन त्या वारसांना व्यक्तिश: भेटून द्या, अशा सूचना दिल्याचे सांगितले. त्यानुसार ते चेक वाटप करण्यात आले आहेत.
विद्यार्थी अपघात विमा वाटपासाठी जिल्हा परिषदेकडे २१ लाखांची रक्कम आली आहे. त्यामुळे माळीणच्या १६ लाभार्थींसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील १२ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांचेही चेक तयार केले असून संबंधित वारसांशी संपर्क साधून त्याचे वाटप सुरू असल्याचे शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)