Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 11:10 AM2023-03-08T11:10:10+5:302023-03-08T11:10:25+5:30
महाविद्यालयात एनसीसीमध्ये आल्यानंतर कर्तव्यपथावर चालण्याचे ध्येय ठेवले होते
पिंपरी : लहानपणापासूनच खेळात आवड त्यामुळे ती एनसीसीमध्ये दाखल झाली. वडीलही शालेय जीवनात एनसीसीचे विद्यार्थी, तर आई खेळांची शिक्षिका. त्यामुळे खेळाचे बाळकडू तिला घरातूनच मिळालेले. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न तिने बाळगले होते. त्यासाठी तिने कठोर मेहनतही घेतली अन् २६ जानेवारी २०२३ ला बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले. तिला कर्तव्यपथावर संचलन करायला मिळाले. हे स्वप्न पाहिले थेरगाव येथील हिंदवी राणे हिने...
थेरगाव येथील हिंदवी राणे ही आकुर्डीतील रामकृष्ण मोरे महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. शालेय स्तरावर तिने स्केटिंग, हँडबॉल, रोलबॉल यामध्ये अनेक पदके मिळविली आहेत. महाविद्यालयात आल्यानंतर तिने एनसीसीमध्येही प्रवेश घेतला. एनसीसीमध्ये आल्यानंतर कर्तव्यपथावर चालण्याचे ध्येय ठेवले होते. त्यासाठी तिने दररोज सकाळी व संध्याकाळी प्रॅक्टिस केली. त्याचे फळ तिला यावर्षी मिळाले.
अशी होते निवड...
महाराष्ट्रातून दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी ११६ कॅडेसची निवड झाली होती. त्यात पुणे ग्रुपमधून उपकॅडेटसची निवड झाली. त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनच्या १३ कॅडेट्सची निवड झाली. यात अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, मुंबई आणि पुणे ग्रुप हेड क्वार्टसचा समावेश असतो. हिंदवी संजय राणे ही प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी व दोन महाराष्ट्र बटालियन एनसीसीची छात्र आहे. हिंदवीने ३० महिन्यांच्या कार्यकाळात १० दिवसांचे एक अशी १० शिबिरे पूर्ण केली. या शिबिरामध्ये मेहनत, परिश्रम व ड्रीलचा नियमित सराव करून तिची दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली.
नवीन युनिट सुरू झाल्यानंतर पहिलीच मुलगी...
नवीन युनिट सुरू झाल्यावर पहिल्याच वर्षी एवढे अभूतपूर्व यश मिळणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे मत एनसीसी युनिटचे प्रमुख लेफ्टनंट डाॅ. ज्ञानेश्वर चिमटे यांनी व्यक्त केले, तर कर्तव्यपथ दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी माझी निवड होणे यामध्ये माझे कुटुंबीय, महाविद्यालय, प्राचार्य, एनसीसी विभागप्रमुख व महाविद्यालयातील सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे. खूप कठोर मेहनतीनंतर ही संधी मिळणे हे स्वप्न होते, ते पूर्ण केल्याचे समाधान आहे, असे हिंदवी राणे म्हणाली.