...तर कोट्यवधींच्या कामांना फटका

By admin | Published: March 27, 2017 03:35 AM2017-03-27T03:35:59+5:302017-03-27T03:35:59+5:30

महापालिकेच्या चालू वर्षाच्या (एप्रिल २०१६ ते मार्च २०१७) अंदाजपत्रकातील सहयादीतील विकासकामांना ३१ मार्चनंतर

... and hit millions of works | ...तर कोट्यवधींच्या कामांना फटका

...तर कोट्यवधींच्या कामांना फटका

Next

पुणे : महापालिकेच्या चालू वर्षाच्या (एप्रिल २०१६ ते मार्च २०१७) अंदाजपत्रकातील सहयादीतील विकासकामांना ३१ मार्चनंतर मुदतवाढ न मिळाल्यास कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना फटका बसून ती अर्धवट राहण्याची भीती निर्माण झाली आहे. आतापर्यंत या कामांना मुदतवाढ देण्याची परंपरा आहे, मात्र पालिकेत सत्तांतर होऊन नव्याने आलेल्या भाजपा सत्ताधाऱ्यांकडून मंजुरी दिली जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या चालू वर्षाच्या (एप्रिल २०१६ ते मार्च २०१७) अंदाजपत्रकातील नगरसेवकांच्या सहयादीतून रस्ते, ड्रेनेज, शाळेचे नूतीनकरण, उद्याने आदी अनेक प्रकारची कामे सुरू आहेत. अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार येत्या ३१ मार्च २०१७ पर्यंतच या विकासकामांवर निधी खर्च करता येणार आहे. गेल्या वर्षभरात लागलेल्या तीन-तीन आचारसंहितांमुळे ही कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे या कामांना मुदतवाढ न मिळाल्यास अथवा आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात यासाठी निधी उपलब्ध न झाल्यास आहे त्या स्थितीत ती थांबवावी लागणार आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांवर टांगती तलवार उभी राहिलेली आहे.
गेल्या वर्षभरामध्ये नगरपालिका निवडणूक, विधान परिषद निवडणूक व महापालिका निवडणूक अशा ३ आचारसंहितांना सामोरे जावे लागले. नगरपालिका निवडणुकीसाठी यंदा पहिल्यांदाच पालिकेच्या क्षेत्रातही आचारसंहिता लागू करण्यात आली होती, याला खूप विरोध झाल्याने काही दिवसांनी ती मागे घेण्यात आली. त्यापाठोपाठ विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेला सामोरे जावे लागले. त्यानंतर लगेच काही दिवसांत महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली. यामध्ये मोठा कालावधी गेला.
नगरपालिका व विधान परिषदांच्या आचारसंहितेमुळे नगरसेवकांच्या सहयादीतील विकासकामांना मंजुरी मिळण्यास खूप विलंब लागला. अगदी शेवटी शेवटी अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अद्यापही अनेक ठिकाणी रस्ते, ड्रेनेज, उद्याने आदींची कामे सुरू असल्याचे दिसून येते. या कामांना जर ३१ मार्चनंतर मुदतवाढ मिळाली नाही, तर ती आहे त्या स्थितीमध्ये थांबवावी लागणार आहेत. महापालिकेच्या मुख्य खात्यामार्फत सुरू असलेली उड्डाणपूल, मोठे रस्ते आदी प्रकल्पांच्या कामांना नवीन अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जाते. मात्र नगरसेवकांच्या सहयादीतील विषयांबाबत त्याच कामांना पुन्हा निधी उपलब्ध करून दिला जात नाही. आयुक्तांकडून साधारण डिसेंबर महिन्यात अंदाजपत्रक तयार होते, नगरसेवकांच्या सहयादीतील अनेक कामेही त्यानंतर सुरू केली जातात. त्यामुळे सहयादीतील कामांसाठी नवीन अंदाजपत्रकात निधी ठेवला जाण्याची शक्यता कमी असते.

नवे अंदाजपत्रक : अंमलबजावणीला आणखी २ महिने
महापालिकेचे आगामी वर्षाचे (एप्रिल २०१७ ते मार्च २०१८) अंदाजपत्रक प्रशासनाकडून ३० मार्च रोजी स्थायी समितीला सादर केले जाईल. त्यानंतर स्थायी समितीमध्ये त्यावर साधकबाधक चर्चा होऊन ते मुख्य सभेला सादर होईल. या सर्व प्रक्रियेला किमान दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या (एप्रिल २०१६ ते मार्च २०१७) अंदाजपत्रकातील सहयादीतील कामांना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.


...तर तांत्रिक अडचणी
४नव्याने झालेल्या प्रभाग रचनेनुसार प्रभागांची रचना व क्रमांक बदलले आहेत.
आता चालू वर्षाच्या सहयादीतील कामांना मुदतवाढ दिल्यास अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतील. त्याचबरोबर सध्या सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी
नवीन अंदाजपत्रकामध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी भूमिका प्रशासनाकडून मांडण्यात येत आहे.

५० कोटींच्या विकासकामांवर परिणाम ?

नगरसेवकांच्या सहयादीतील विकासकामांवर यंदा साधारणत: ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी २०० कोटी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत.

बहुतांश कामे ही अंदाजपत्रकातील निधीपेक्षा बिलो आल्याने आता केवळ ५० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मुदतवाढ न मिळाल्यास या ५० कोटी रुपयांच्या विकासकामांवर परिणाम होण्याची भीती आहे.

मुदतवाढ देण्याची महापौरांकडे मागणी
नगरसेवकांच्या सहयादीतील विकासकामांना ३१ मार्चनंतर दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तसेच ज्या वर्षात कोणतीही आचारसंहिता लागते तेव्हा साधारणत: अशा विकासकामांना मुदतवाढ देण्याची पालिकेची परंपरा आहे. याचेच पालन आताही व्हावे अशी अपेक्षा आहे.
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेता

Web Title: ... and hit millions of works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.