...आणि तासात झाले उरुळी कांचन, सासवड शहर स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:47 PM2018-07-11T23:47:57+5:302018-07-11T23:48:15+5:30
‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने.
उरुळी कांचन : ‘स्वच्छ वारी स्वस्थ वारी - निरोगी मनाची मशागत भारी’, ‘निर्मलवारी निसर्गवारी पर्यावरणाचे रक्षण करी’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने जर कोणी वापर केला असेल, तर तो उरुळी कांचनच्या ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने. फक्त एका मोबाइलच्या मेसेजवर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी उपस्थित होऊन गावाची स्वच्छता केली.
संत तुकाराममहाराज पालखी प्रस्थानानंतर गावामध्ये झालेला कचरा घाण साफ करण्यासाठी येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था, महिला मंडळे, गणेश मंडळे, गाव पुढारी इत्यादींना आवाहन केले होते. त्याप्रमाणे मंगळवारी (दि. १०) गावातील पालखी मार्गावर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या सातत्याचे हे तिसरे वर्ष आहे.
संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी दुपारच्या विसाव्यासाठी उरुळी कांचन येथे आला होता. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, खासगी व सामाजिक संस्था वारकºयांसाठी चहा, बिस्किटे, फळे, अल्पोपहार, जेवण देतात व त्यामुळे परिसरात कचºयाची प्रचंड
प्रमाणात वाढ झाल्याने गावाची आरोग्यसमस्या वाढते.
यावर उपाय म्हणून उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, ग्रामपंचायत सदस्य, मंडलाधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी , निसर्गोपचार आश्रम ट्रस्ट, साईनाथ मित्र मंडळ, शौर्य करिअर अॅकॅडमी, शिक्षणा फाउंडेशन, पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेज यांनी स्वच्छता मोहिमेत सर्वांनी हातात झाडू घेऊन सहभागी होऊन गावातील आश्रम रोड, मुख्य बाजारपेठ, महात्मा गांधी रोड, तळवाडी चौक, शाळा परिसर आणि पालखी मार्गावरील दिंड्यांच्या विसाव्याची ठिकाणे स्वच्छ करत. एका तासाच्या आत पालखी गावात आली होती का नव्हती, असे वाटावे, असा परिसर स्वच्छ केला.
हवेलीचे नायब तहसीलदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांनी पालखीला
दौंड हद्दीत पोहोचवून परत येताना
गाव चकाचक पाहून या उपक्रमाचे कौतुक केले.
सासवड : संत ज्ञाननेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे ९ व १० जुलै रोजी होता. १० जुलै रोजी संत सोपान व संत चांगा वटेश्वर यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरला मार्गस्थ झाल्यानंतर सासवड नगर परिषदेने तातडीने सासवड येथील पालखीतळ स्वच्छ करण्यास सुरुवात केली. वारकºयांनी जेवणानंतर टाकलेले पत्रावळी, द्रोण, पाण्याच्या बाटल्या, चहाचे ग्लास, फळांच्या साली, अशा तत्सम प्रकारचा तब्बल २५ ते ३० टन कचरा यावेळी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या मदतीने संकलीत करून पालखी तळा सोबतच सासवड शहर देखील स्वच्छ केले.
नगरपालिकेकडुन कचरा संकलना नंतर लगेचच शहर परिसरात जंतुनाशक पावडर टाकण्यात आली. तसेच पुणे महानगरपालिकेच्या वाहनाच्या सहाय्याने जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. नगरपालीकेच्या अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने शहरातील रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्याचे काम चालु आहे.
पालखी सोहळ्यातील दिंड्यांना नगरपालिकेने कचरा साठवुन ठेवण्याकरिता ४०० गोण्या दिल्या होत्या. यामुळे कचरा इतरत्र टाकला न जाता त्याचे एकाच ठिकाणी सहज संकलन करता आले. नगरपालिकेचे ४ बोलेरो, २ ट्रॅक्टर, आदर पुनावाला ग्रुपचे कचरा संकलनाची ४ वाहने, पुणे महानगरपालिकेचे जंतुनाशक वाहन, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. स्वच्छता उपक्रमात सासवड नगरपालिकेस पुणे महानगरपालिका, आदरपुनावाला, थं क्रिएटीव्ह, या संस्थाचे सहकार्य लाभले, अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण व नगरसेवक अजित जगताप व संदिप जगताप यांनी दिली.