... ही काळजी अन् आपुलकी केवळ ST वाल्यांकडेच, वेळ रात्री ११.४५... पुण्यातली बस अन् 'ती' ताई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 08:30 AM2022-06-16T08:30:33+5:302022-06-16T10:23:05+5:30

वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये घडलेला संपूर्ण किस्सा त्यांनी सांगितला

... And I got bored of her, Vasant More narrated the story of the night | ... ही काळजी अन् आपुलकी केवळ ST वाल्यांकडेच, वेळ रात्री ११.४५... पुण्यातली बस अन् 'ती' ताई

... ही काळजी अन् आपुलकी केवळ ST वाल्यांकडेच, वेळ रात्री ११.४५... पुण्यातली बस अन् 'ती' ताई

Next

पुणे - मनसेचे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या कामानिमित्ताने, राजकीय घडामोडींमुळे किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे ते अनेकांचे लक्ष केंद्रीत करत आहेत. कोरोना काळात आपल्या धडाकेबाज कामातून त्यांनी त्यांची सामाजिक क्षेत्रातील प्रतिमा निर्माण केली आहे. तर, नगरसेवक म्हणूनही ते नेहमीच अनेकांच्या मदतीला धावतात. सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ते एका महिलेच्या मदतीला धावले. 

वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये घडलेला संपूर्ण किस्सा त्यांनी सांगितला. प्रवासी महिला भगिनीसाठी थांबलेली बस, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर पाहून त्यांनी महिलेची मदत केली. तसेच, कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्यातील आपलेपणाचं कौतुकही केलं. पोस्टमध्ये वाचा नेमकं काय घडलं.... 

वसंत मोरेंची ट्विटर पोस्ट

वेळ रात्री ११.४५ ची. ठिकाण कात्रज-कोंढवा राजस चौक, पुणे. मी काल नेहमीप्रमाणे चौकातील भटक्या कुत्र्यांना खायला घालायला गेलो तर एक PMPML पुणेची बस पूर्ण लाईट लावून उभी होती आणि गाडीचा कंडक्टर गाडीभोवती फिरत होता. ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसून होता. थोडा संशय आला म्हणून कंडक्टरला विचारले काय प्रकार आहे. तेव्हा ते म्हणाले की आम्ही सासवडवरून आलोय, गाडीत एक महिला आहे तिला छोटे बाळ आहे. त्या इकडे बाजूला राहतात. निघताना सांगितले होते की त्यांना राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल, पण १५ मिनिटं झाले कोणीच येत नाही, फोन लागत नाही. आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण, आणि आता रिक्षाही मिळत नाही. मग, मी म्हटलं त्यांचा दीर नाही आला म्हणून काय झालं, मीच त्यांचा दीर झालो. त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोहचवले. घराच्या दारात पोहोचवले म्हणून फोटोही काढला. 

पण खरे धन्यवाद त्या MH 12 RN 6059 बस च्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला! त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली. त्या दोघांची नावे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर!. यात एक चूक घरच्यांची, एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली? बर सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजीपणा का केला? थोडे तरी शहाणे व्हा, अशी ट्विटवर पोस्ट वसंत मोरेंनी केली आहे. 

महिलांच्या सुरक्षेबाबत कुटुंबीयांनी निष्काळजीपणा करु नये आणि महिला सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असेच त्यांनी आपल्या कृतीतून आणि पोस्टमधून समजावले आहे. 

Web Title: ... And I got bored of her, Vasant More narrated the story of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.