..अन् वृक्षाच्या मुळाशी विसावल्या ‘नटसम्राटा’च्या अस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 01:33 PM2020-01-20T13:33:53+5:302020-01-20T13:34:38+5:30
कोथरूडमध्येच वास्तव्यास असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांचे फिरायला जाण्यासाठीचे आवडते ठिकाण म्हणजे एआरएआयची टेकडी होती...
पुणे : ज्या ‘नटसम्राटा’च्या संवादफेकीने आणि आवाजाने आपली वेगळी ओळख निर्माण केली, तसेच त्यांचं जाणं देखील प्रत्येकाच्या मनात वेदना देऊन गेली. पण हा ‘नटसम्राट’ पुणेकरांसाठी मात्र सतत ‘बहरत’ राहणार आहे. या ‘नटसम्राटा’च्या आठवणी कोथरूड येथील ‘एआरएआय’ टेकडीवर कायम जपून राहाव्यात, यासाठी तिथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षापरोण करताना मुळाशी डॉ. लागू यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या. त्यामुळे हा वृक्ष डॉ. लागू यांच्या आठवणींना उजाळा देत राहील.
ज्या ठिकाणी ‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू सकाळी येऊन विश्रांती घ्यायचे, त्याच ठिकाणी हे स्मृतिस्थळ तयार करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या अजरामर झालेल्या नाटकातील प्रसिद्ध संवादाचे स्मृतिफलकही येथे उभारले आहेत. ‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांचे एक महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि वसंत वसंत लिमये यांच्यातर्फे एआरएआय टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजिला होता.
या वेळी डॉ. दीपा श्रीराम, डॉ. मोहन आगाशे, प्रा. श्री. द. महाजन, सतीश आळेकर, वसंत वसंत लिमये, श्रीरंग गोडबोले, चंद्रकांत काळे, नंदा पैठणकर, सुनील बर्वे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, सुनीती जैन, डॉ. प्रभा गोखले, विभावरी देशपांडे, माधुरी सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.
मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले. गौरी लागू यांनी सूत्रसंचालन केले.
........
काव्यातून डॉ. लागू यांच्या आठवणींना उजाळा
नाटकातील शब्दांवर जसे डॉ. लागू यांचे प्रेम होते तसेच कवितेवरही होते. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांच्या आवडत्या कविता आणि नाट्यांश सादर केले.
त्यामुळे उपस्थित डॉ. लागूंच्या आठवणींमध्ये रमले. या भावस्पर्शी कार्यक्रमास अनेक नाट्यप्रेमी आणि टेकडीप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली.
.........
‘मृत्यूची भीती तर माणसाला नसावीच, ज्याला थोडंसुद्धा चांगलं काही करायचं आहे. तो स्वत:ला फक्त एकच प्रश्न विचारू शकतो. मी करतोय ते चांगलं का वाईट ? बास! त्यानं मृत्यूची गणितं मुळी मांडताच कामा नयेत.’ हे मकरंद साठे लिखित ‘सूर्य पाहिलेला माणूस’ या नाटकातील संवाद फलकावर अनेकांना प्रेरणा देत राहील.
..........
‘ज्योतीनं आंतर-जातीय लग्न केलं आणि आज खऱ्या अर्थानं आपण जातपात तोडली आहे. माझं घर खऱ्या अर्थानं भारतीय बनलं आहे. त्यामुळे आपण फार खुशीत आहोत आज ! मीच नवा झालो आहे!’’ हे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘कन्यादान’ नाटकातील शब्द स्फूर्तीदायक आहेत.
.......
‘‘जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळयाशार डोहामध्ये ? आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं माझा तुझा यांचा आणि त्याचाही !’’ हे वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ मधील प्रसिद्ध संवाद आहे.
.....
...ते बाकडे म्हणजे डॉ. लागूंची आठवण
कोथरूडमध्येच वास्तव्यास असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांचे फिरायला जाण्यासाठीचे आवडते ठिकाण म्हणजे एआरएआयची टेकडी होती. येथील एका बाकावर ते बसलेले असल्याचे अनेकांनी पाहिलेले आहे. याच ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याबरोबरच त्यांच्या अभिनय कारकिर्दीस मानाचा मुजरा करण्यासाठी स्मृतिवृक्ष लावण्यात आला. ‘नाटककाराचा माल प्रेक्षकांकडे नेऊन टाकणाऱ्या एखाद्या लमाणाप्रमाणे आयुष्य माझे...’ हे ‘लमाण’मधील वाक्य या फलकावर लिहिले आहे. डॉ. लागू यांच्या विविध नाटकातील गाजलेली वाक्ये आणि त्याच नाटकातील भावमुद्रा असलेले फलक या ठिकाणी लावण्यात आले होते.