जुळून आल्या रेशीमगाठी! घरात झाल्या सप्तपदी अन् घुमले मंगलाष्टकांचे स्वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 09:18 PM2020-04-16T21:18:21+5:302020-04-16T21:55:59+5:30
कोरोनामुळे घरातच मुहूर्त साधत केले कन्यादान
बेलाजी पात्रे -
वाकड : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाचे सर्वच स्तरावर दुरगामी परिणाम झाले आहेत. या महाभीषण संकटामुळे छोट्या मोठ्या उद्योग धंद्यांसह सगळ्यांनाच अडचणीत आणले . त्याचसोबत समाजातले अनेक मंगलकार्ये, धार्मिक सोहळे यांच्यावर देखील संक्रांत कोसळली..मात्र या गंभीर परिस्थिती देखील समाजभान जपण्याची जबाबदारी काहीजण उचलतात आणि समाजात एक आदर्श निर्माण करतात. त्याच पार्श्वभूमीवर घडलेली घटना म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक भान ठेवत नेरेतील (मुळशी) पित्याने कुठलाही गाजावाजा न करता आपल्या लाडक्या एकुलत्या एक कन्येचे राहत्या घरातुनच कन्यादान करत विवाह सोहळा पार पाडला. या कौतुकास्पद कृतीतून या कुटुंबांनी समाजाला एक वेगळा आदर्श घालून देत जमावबंदीची पायमल्ली करणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक लगावली आहे.
प्रेरणा शिक्षण संस्थेच्या तुकाई माध्यमिक विद्यालयात सेवक असलेल्या अनिल जाधव यांची कन्या मेनका उर्फ अस्मिता हिचे कुसगाव (मावळ) येथील राजाराम केदारी यांचे यांचे चिरंजीव अनिकेत यांच्याशी रेशीमगाठी जुळली. त्यानुसार ८ डिसेंबर २०१९ रोजी साखरपुडा संपन्न झाला आणि याच बैठकीत १५ एप्रिल ही लग्नाची तारीख देखील पक्की झाल्याने जाधव आणि केदारी या दोनही घरी आनंदाचे वातावरण होते.
जस-जशी लग्न घटिका समीप येत होती तसे घरात मांडव वारे वाहू लागले, लग्नाची लगबग सुरू झाली मात्र पुढे मार्च महिना आला आणि सर्व आनंदावर विरजण पडले. जनता कर्फ्यु व लॉक डाऊनमुळे सर्व लग्न सोहळ्यावर निर्बंध आले, संपूर्ण नियोजन ढासळले. लग्न पुढे ढकलण्याच्या घालमिलीत दोनही कुटुंब असताना अखेर वधू पिता अनिल जाधव यांनी पुढाकार घेत परस्थितीचे गांभिर्य सर्वांच्या लक्षात आणून देत कुठलाही थाट माट न करता घरातील सदस्यांसमवेत घरीच मुलीचे हात पिवळे करून देण्याचा पर्याय ठेवला.
या निर्णयाचे वर अनिकेत व त्यांच्या कुटीबीयांनी तसेच वधू मेनका यांनी स्वागत केले त्यामुळे केवळ घराच्या सदस्यांच्या साक्षीने अगदी साध्या पद्धतीने सकाळच्या मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र, यावेळी देखील सोशल डिस्टन्सचे नियम सर्व पाळण्यात आले. सामाजिक जबाबदारीचे व सुरक्षिततेचे भान ठेवून वऱ्हाडी , बँडबजा, जेवणावळीच्या पंक्ती, मिरवणूक, सनई- चौघडांच्या विरहित घरातूनच मंगलाष्टकांचे स्वर घुमले. हा अजब व सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पडल्याने पंचक्रोशीतुन जाधव आणि केदारी कुटुंबियांच्या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.