अन् आईला भेटली तिची चिमुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:27 AM2018-06-24T03:27:25+5:302018-06-24T03:27:30+5:30
येथील संभाजीनगर परिसरात गुरुवारी सकाळी रस्त्याच्याकडेला सहा वर्षांची मुलगी रडत उभी होती. रस्ता चुकल्यामुळे कुठे जावे, हे तिला समजत नव्हते.
पांडुरंग मरगजे
धनकवडी : येथील संभाजीनगर परिसरात गुरुवारी सकाळी रस्त्याच्याकडेला सहा वर्षांची मुलगी रडत उभी होती. रस्ता चुकल्यामुळे कुठे जावे, हे तिला समजत नव्हते. तिची ही अवस्था एका महिलेने पाहिली आणि त्यांनी तिची विचारपूस केली. त्यानंतर पोलीसही त्या ठिकाणी आल्याने त्यांनी सुखरूप त्या मुलीला तिच्या घरी पोहोचवले.
धनकवडी येथील संभाजीनगर परिसरात मुख्य रस्त्याकडेला हातात पिशवी घेऊन रडणारी मुलगी पाहून तिची विचारपूस करण्यासाठी महिलांनी गर्दी केली. गर्दी पाहून दुचाकीवरून निघालेले धनकवडी पोलीस चौकीचे पोलीस व्यंकट पवार व सुधीर साबळे तिथे थांबले. राष्ट्रशक्ती संघटनेचे पद्माकर कांबळे पोलिसांच्या मदतीला आले. रडणारी मुलगी तिचे नाव सोनाक्षी असे सांगत होती. तिच्या हातातील पिशवी पाहिली तर त्यात वही, पेन, डबा आणि पाण्याची बाटली होती. तिला शाळेचे नाव पोलिसांनी विचारले तर ती म्हणाली बिबवेवाडी. यावरून पोलीस महापालिकेच्या शाळेत गेले. काही शिक्षकांना विचारत असतानाच सोनाक्षीला एका शिक्षिकेने ओळखले.
पोलीस आणि राष्ट्रशक्तीचे पद्माकर कांबळे थेट मुख्याध्यापकांकडे गेले. शाळेच्या नोंदवहीत लिहून ठेवलेला तिच्या आईचा मोबाईल नंबर शोधून मुख्याध्यापकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्या कामावरून तत्काळ परत येऊ शकत नसल्यामुळे त्यांनी सोनाक्षीला शाळेतच
थांबवून घेण्यास सांगितले. संध्याकाळी शाळा सुटण्यापूर्वी शाळेत येण्याच्या सूचना मुख्याध्यापकांनी सोनाक्षीच्या आईला केली. मुलीला सुखरूप शाळेत सोडल्यानंतर
पोलीस आणि राष्ट्रशक्तीचे
कार्यकर्ते परतले. पंरतु काळजीपोटी संध्याकाळी पावणेपाच वाजताच राष्ट्रशक्तीचे पद्माकर कांबळे व
मंगेश सातंगे हे शाळेत पोहोचले. दरम्यान, त्याचवेळी सोनाक्षीची
आई दुर्गा याही शाळेत आल्या
होत्या. पद्माकर कांबळे यांनी पोलिसांना बोलावून घेतले. संपूर्ण चौकशी करून पोलिसांनी मुलीला आईकडे सोपवले.
आईच्या शोधासाठी पडली बाहेर
संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या दुर्गा महाडिक शिंदे या बाणेरला खासगी कंपनीत काम करतात. गुरुवारी सकाळी कामाला जाताना सोनाक्षीला आत्याकडे सोडून त्या बाणेरला कामासाठी निघून गेल्या होत्या. काही वेळाने सोनाक्षी आईला शोधत बाहेर आली आणि थेट संभाजीनगर मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचली. परत घरी जाण्याचा रस्ताच सोनाक्षीला सापडत नव्हता. त्यामुळे ती हरवली होती.