..आणि मित्राचा खून झाला उघड, मृतदेहाचे तुकडे जाळून टाकले कालव्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 12:02 AM2017-11-01T00:02:30+5:302017-11-01T00:02:47+5:30
पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून दहा महिन्यांपूर्वी निर्घृणपणे केलेल्या मित्राच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे.
पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीकडून दहा महिन्यांपूर्वी निर्घृणपणे केलेल्या मित्राच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मृतदेहाचे तुकडे अर्धवट जाळून वानवडी परिसरातील कालव्यात टाकून दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
विक्रम शेखर पिल्ले (वय २८, रा. फातिमानगर), राजु शिवाप्पा नारायण नाईक (वय ३४), संभू बाळकृष्ण थापा (वय २० दोघेही रा. बी.टी.कवडे रोड, घोरपडी), फारूक रफिक शेख (वय २६) आणि शहारूख सिकंदर शेख (वय २५, दोघेही रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिल्ले विरोधात पाच गुन्हे दाखल असून तो खंडणीच्या गुन्ह्यात फरार होता. न्यायालयाने त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बी. टी. कवडे रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी काही युवक कॅनॉल रोड येथे येणार असल्याची माहिती युनिट एकमधील पोलीस शिपाई गजानन सोनुने यांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी ( दि. २८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पथकाने सापळा लावून पिल्लेसह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एअर गन, काडतुसे, चार कोयते, मास्क, दोरी, मोबाईल असा १८ हजार ३०० रूपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्याकडे केलेल्या तपासात जानेवारी २०१७ च्या दुसºया आठवड्यामध्ये आरोपींनी त्यांचा मित्र विकी रमेश पोताण (वय २५ रा. ढोबळवाडी, वानवडी) याचा खून केल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले, समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन भोसले पाटील, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी प्रकाश लोखंडे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, राजाराम सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जॉकी.. ते गुन्हेगार
आरोपी विक्रम पिल्ले हा हॉर्स रायडर (जॉकी) म्हणून पेसी शॉप आणि मल्लेश नरेडू या कंपनीमध्ये नोकरी करीत होता. त्यास दीड लाख रुपये वेतन होते. हॉर्स रायडिंग मध्ये सहभाग घेण्यासाठी त्याने इंग्लंड आणि मलेशिया या देशांमध्ये काही वर्षे वास्तव्य केले आहे. मात्र, वाईट वर्तनामुळे त्याला कंपनीतून काढूले होते. त्यानंतर दोन वषार्पूर्वी त्याने वानवडी परिसरात चायनिज हॉटेल टाकले होते. केवळ सहावी पर्यंत शिक्षण घेतलेला पिल्ले सफाईदारपणे इंग्रजीत संभाषण करतो.