...अन् वाढदिवशी अचानक शेतात शरद पवार आले आणि अभिष्टचिंतन व शुभेच्छा दिल्या
By श्रीकिशन काळे | Published: August 3, 2023 03:22 PM2023-08-03T15:22:05+5:302023-08-03T15:22:48+5:30
ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर काहीही माहिती न देता पवारांनी थेट त्यांच्या शेतात जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या
पुणे : निसर्गाशी एकरूप होऊन कवितेबरोबरच शेती करणारे ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर यांचा वाढदिवस होता. तेव्हा त्या दिवशी त्यांच्या शेतामध्ये त्यांना भेटायला खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आले होते. महानोर यांना काहीही माहिती न देता पवारांनी थेट त्यांच्या शेतात जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ही २०१६ मधील प्रसंग आहे. याविषयीची आठवण महानोर यांनी फेसबुकवर फोटोसह पोस्ट केली होती. ती त्यांची पोस्ट फोटोसह खास त्यांना आदरांजली म्हणून देत आहोत.
दि. 16 सप्टेंबर 2016
- मी माझा वाढदिवस कधीच उत्सवानं साजरा करीत नसतो. आपल्या रानातल्या घरी बसून येतील त्या स्नेहीजनांच्या शुभेच्छा, आशीर्वाद स्विकारीत असतो. या १६ सप्टेंबरला म्हणे अमृत महोत्सवी वर्ष आहे. म्हणून आम्ही कुटुंबीय शेतातल्या घरी असतांना न सांगता अकस्मात श्री. शरदराव पवार साहेब आले. अभिष्टचिंतन व शुभेच्छा दिल्या. अगदी कौटुंबिक भेटी. विधिमंडळात मी बारा वर्षे काम करतांना शेती, पाणी, दुष्काळ, फलोद्यान, ठिबक, पाणी व्यवस्थापन, ‘पाणी अडवा जिरवा’ ते जलसंधारण जलयुक्त अभियान, या सोबतच साहित्य संस्कृती मंडळ, कला अकादमी, चित्रपट, ग्रंथालयं व अनेक सामाजिक प्रश्नांची दीर्घ चर्चा, ठराव मांडले, बहुसंख्य शासनानं पारित केले. याचा मला खूप आनंद आहे. विधिमंडळातल्या त्या निवडक कामकाजाचा ऐवज ‘विधिमंडळातून’ या पुस्तकातून मी प्रकाशित केला. श्री. शरदराव पवार साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकांच प्रकाशन १६ सप्टेंबरला पळासखेडच्या माझ्या रानात झालं. त्यामुळे अवघ्या प्रसिध्दी माध्यमांनी ते महाराष्ट्रभर दाखविलं. आश्चर्य व आनंद याचा की पंधरादिवस खुप झाले. खूप फोन भेटी- अनेक क्षेत्रातल्या स्नेही मंडळींनी मला शुभेच्छा व आशीर्वाद दिले. माझी ही आनंदयात्रा त्यांनी भरभरुन अधिक आनंददायी केली. ‘विधिमंडळातून’ या ग्रंथाचं भक्क्म स्वागत केलं. मी भरुन पावलो.
4 महिन्यांपूर्वी माझं फार मोठं हृदयाचं ऑपरेशन झालं. यामुळे माझं शारिरिक मानसिक दु:ख हलकं झालं. माझ्यावर प्रेम करणाऱ्या या स्नेही मंडळींचे आभार यातुन, मी धन्यवाद कसे देवु? गलबला होतो. डोळे भरुन येतात. एका लहानशा खेड्यातल्या मला शेतकऱ्याला कवीला शब्दांनी सांगता येणार नाही इतकं दिलं. त्या सकलांसाठी माझे नम्रता पूर्वक नमस्कार. मिळालेलं जादा आयुष्य, तीच खेडी, तिथला शेतकरी मजूर आणि नव्यानं छान लिहिणाऱ्या साहित्यिक तरुणांसाठी, कलावंतांसाठी, माझ्या परीनं त्यांना देईन. एवढचं या निमित्तानं सांगतो.
- कवीवर्य ना. धों. महानोर