... अन् प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 07:32 PM2019-08-26T19:32:00+5:302019-08-26T19:33:03+5:30
चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबविली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती...
पुणे : वेळ सकाळी ६.३०... पीएमपीची बस दिवे घाट उतरत होती... बसमध्ये २० ते २५ प्रवासी असतील... निम्मा घाट ओलांडल्यानंतर एका वळणावर बसचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात येते... याची माहिती तो वाहकाला देतो... नंतर प्रवाशांना समजते, अन् त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो... पुढे काही कळण्याच्या आत चालक प्रसंगावधान दाखवत बसला डोंगरालगतच्या चारीत घालतो... बस थांबल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडतो. घाटात घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील प्रवासी पुरते घाबरून गेले होते.
पीएमपी बसच्या ब्रेकफेलचे सत्र अद्याप थांबलेले नाही. दि. १६ ऑगस्ट रोजी बेंगलुरू महामार्गावर आंबेगाव बु.जवळ, दुसऱ्या दिवशी स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गात भारती हॉस्पिटलसमोर आणि मागील आठवड्यात गुरूवारी (दि. २२) तोफखानाजवळ बसचे ब्रेकफेल झाल्याच्या घटना घडल्या. तर सोमवारी (दि. २६) दिवे घाटातच ब्रेकफेल झाले. सुदैवाने चारही घटनांमध्ये प्रवाशांना दुखापत झाली नाही. पण घाटात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबविली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. .
हडपसर आगाराची ही बस (बस क्रमांक -एमएच १२, ईक्यु ८००२) सकाळी ६ वाजता सासवड स्थानकातून स्वारगेटच्या दिशने निघाली होती. साडे सहा वाजण्याच्या सुमारास बसने निम्मा घाट पार केला होता. त्यावेळी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. अचानक एका वळणावर बसचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. सकाळी मार्गावर वाहनांची गर्दी नसल्याने चालकाने काही वेळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याने तातडीने वाहक व प्रवाशांना याची कल्पना दिली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. प्रवाशांना बसमधील आसनांच्या मधल्या जागेत उभे राहण्यास सांगितले. घाटातील डोंगरालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चारी आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत या चारीमध्ये बस घालून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. बस चारीत गेल्यानंतर एक बाजू डोंगरावर आपटून बस थांबली. पण बसचे दरवाजे डोंगराला खेटल्याने प्रवाशांना उतरताना अडचणी आल्या. दरम्यान, या घटनेत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. पीएमपीच्या २-३ कर्मचाऱ्यांना खरचटले आहे. अपघाताचा तांत्रिक अहवाल आल्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी सांगितले.