... आणि पुणेकरांनी ' असे ' केले मराठी नववर्षाचे स्वागत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:36 PM2020-03-25T12:36:44+5:302020-03-25T12:59:37+5:30
रस्त्यावर शुकशुकाट, घरात आनंदाचे वातावरण
पुणे : वसंत ऋतू आगमन, झाडांची फुटणारी नव पालवी यांसह रांगोळी, तोरणे आणि घरोघरी गुढी उभारुन दरवर्षी केली मराठी नववर्षाची सुरुवात होेते. मराठमोळ्या वर्षातला पहिलाच सण म्हणून याची गणना होते. यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट आहे. तसेच मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात काल रात्री पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, असे असतानाही पुणेकरांनी पाडव्याकरिता ज्या वस्तू बाजारात उपलब्ध होत्या त्या खरेदी करून घरोघरी गुढी उभारुन किंवा मग रांगोळीत गुढीचे चित्र काढून नववर्षाचे आनंदाच्या उत्साहात स्वागत केले. तसेच जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना देखील केली.
सकाळी सकाळी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात पहिल्या सापडलेल्या पुण्यातील कोरोना रुग्णाला आज डिस्चार्ज मिळाला ही आनंदाची बातमी आली.त्याने पुणेकरांच्या मनाला दिलासा मिळाला तसेच सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले. कारण गेली कित्येक दिवस आरोग्य विभाग, प्रशासन, डॉक्टर, कोरोनाबाधित रुग्ण, नर्स , वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले होते. या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या मनात कोरोनाबद्दल निर्माण झालेली भीती होण्यासाठी आणि जे या विळख्यात सापडलेले आहे त्यांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होईल.
शहरभरात कोरोनाचे सावट असताना देखील घरच्यांसमवेत गुढीपाडवा साजरा करता आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले. सर्वत्र शुकशुकाट असून देखील घरोघरी उभारण्यात आलेल्या गुढीने पुणेकरांच्या मनाला दिलासा दिला.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन झाल्याचे कळताच पुणेकरांनी बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. एकीकडे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि दुसरीकडे बंद असलेल्या बाजारपेठा यात खरेदी कशी करावी या संभ्रमावस्थेत नागरिक असल्याचे दृश्य बुधवारी पाहावयास मिळाले. कुणीही गर्दी करू नये यासाठी पोलिसांची सारखी गस्त सुरू असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जाताना नागरिकांच्या मनात अद्याप भीतीचे सावट आहे.
मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून यापुढील 21 दिवस देशात लॉकडाऊन असल्याचे घोषित केले. त्यानंतर थोड्याच वेळाने रात्रीच्या वेळी बाजारात किराणा माल घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. जिल्हाधिकारी प्रशासन यांनी नागरिकांना सकाळच्या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी साठी बाहेर पडता येईल असे सांगितल्या नंतरही पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी नागरिकांना प्रयत्न करावे लागले. शनिवार पेठ, नारायण पेठ, रविवार पेठ याठिकाणी दुचाकीवरून नागरिक खरेदीसाठी यायला लागल्या नंतर पोलिसांनी त्यांना हटकण्यास सुरुवात केली. तसेच अनेक वाहनचालकांना दरडावून पुन्हा पाठवले. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.