अन् ‘पुरुषोत्तम’चा पडदा उघडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:21 AM2017-08-09T04:21:08+5:302017-08-09T04:21:12+5:30
अरे... आव्वाज कुणाचा... च्या आरोळ्या..शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट अशा अभूतपूर्व जल्लोषात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा पडदा उघडला.
पुणे : अरे... आव्वाज कुणाचा... च्या आरोळ्या..शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट अशा अभूतपूर्व जल्लोषात पुरुषोत्तम करंडक
स्पर्धेचा पडदा उघडला. व्हीआयटी, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अहमदनगर प्रेमराज सारडा या महाविद्यालयांच्या एकांकिकांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशीची नांदी झाली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ५१ संघांमध्ये चुरस रंगणार आहे.
‘कौन कितने पानी में हैं?’ हे पहिल्या फेरीतच ठरत असल्यामुळे एकमेकांना शह देण्यासाठी संघांचे तगडे सादरीकरण आणि आपल्या महाविद्यालयाला चिअर अप करण्यासाठी लागलेली चढाओढ, अशा वातावरणात ‘व्हीआयटी’च्या ‘वेध’ या एकांकिकेने स्पर्धेचा श्रीगणेशा झाला.
अंतराळातील ग्रहमालांमध्ये पृथ्वीप्रमाणे वस्ती असेल का, याचा शोध घेणाºया शास्त्रज्ञांवर ही एकांकिका आधारली होती.
त्यातून इस्रो आणि नासामध्ये चालणारी तात्त्विक स्पर्धा, शास्त्रज्ञांचे कुतूहल त्याच्याशी जोडली गेलेली राजकीय, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाबी मांडण्याचा प्रयत्न या एकांकिकेतून करण्यात आला. इस्रोमध्ये काम करणाºया शास्त्रज्ञांनी अर्धवट सोडलेले काम त्यांची मुलगी त्याच स्थानी येऊन पूर्ण करते. विद्यार्थी लेखक अमित भुसारी याने या एकांकिकेचे लेखन केले होते. सानिका पत्की,
दिग्विजय अंधोरीकर यांनी नाटकाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली संगीत आणि प्रकाशयोजना ही एकांकिकेची
जमेची बाजू ठरली.
लक्षवेधी विषय
‘व्हीआयटी’ ची एकांकिका सादर झाल्यानंतर कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘साकव’ ही एकांकिका सादर केली. मुंबईमध्ये पावसामुळे झालेल्या प्रलयात अडकलेल्या एका कुटुंबाची गोष्ट या एकांकिकेद्वारे सादर झाली. त्यानंतर अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका सादर केली.
साध्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेला एक गृहस्थ एसटीमध्ये ड्रायव्हर होण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठी दहावी उत्तीर्ण होण्याची अट असल्याने तो परीक्षाही देतो; पण त्यात अपयशी होतो. ड्रायव्हरच्या स्वप्नांचा हा प्रवास मांडण्याचा प्रयत्न या एकांकिकेत करण्यात आला होता.