'ती' स्मशानात एकटीच जळत होती; पोटच्या मुलाने सोडलं वाऱ्यावर आणि सख्या भावाने केला तिरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 05:45 PM2020-07-22T17:45:38+5:302020-07-22T18:10:56+5:30
महिलेच्या मुलाला फोन केल्यावर लॉकडाउनमुळे मी येऊ शकत नाही अंत्यविधी उरका, माझी काही हरकत नाही असे उत्तर मिळाले.
सोमेश्वरनगर : पोटच्या मुलाने वाऱ्यावर सोडलं आणि सख्या भावाने तिरस्कार केला शेवटी ती दोन दिवस उपाशी तापासी राहिली आणि ज्या मातीत आयुष्य काढलं शेवटी त्याच मातीत येऊन जीव सोडला ... हृदय पिळावून टाकणारी घटना सोमेश्वरनगर परिसरातील एका गावात घडली आहे.
मंगळवारी त्यावर सामाजिक कार्यकर्त्यांंनी आणि लांबच्या नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. वयाच्या ७५ तर ८० वर्षात या वयोवृध्द महिलेने दुसऱ्याच्या शेतात काम करून स्वत:चा उदरनिर्वाह केला. शेवटपर्यंत एकटीच राहिली, रक्ताची नाती आयुष्यभर तिच्या कधी जवळपण आली नाहीत, आणि शेवटच्या क्षणाला देखील कोण बरोबर नव्हतं...पोटच्या मुलाने व सख्या भावाने देखील शेवटच्या घटकेला साथ दिली नाही.
सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील एक ८० वर्षांची महिला आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणी मुंबई स्थायिक मुलाकडे हवा पालटासाठी गेली होती. आज अचानक तिचा मृतदेहच सापडला... आज सकाळी वाघळवाडी गावातील काही युवक निरा बारामती रोडवरील हॉटेल अक्षय गार्डन या ठिकाणी गेले असता त्यांना एक ही महिला झोपल्याचे दिसले त्यांना काहीच हालचाल दिसली नसल्याने या युवकांनी पोलीस आणि स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुंबई स्थायिक असलेल्या मुलाला फोनवरून कल्पना दिली असता, लॉकडाउनमुळे मी येऊ शकत नाही अंत्यविधी उरका माझी काही हरकत नाही असे उत्तर मिळाले. ती वयोवृध्द महिला अनेक महिने या गावात नसल्याने पटकन तिला कोणी ओळखलच नाही.दोन दिवसापासून ही महिला अक्षय गार्डन येथेच झोपत असल्याचे पाहणाऱ्यांना सांगितले, कदाचित अंगात त्राण नसावा अथवा तिला दोन दिवसांपासून अन्न मिळाले नसावे त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. मात्र ही ज्येष्ठ महिला मुंबईवरून आली आणि तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू नक्की कोरोनामुळे झाला की वृद्धापकाळाने हे समजत नव्हतं त्यामुळे तिच्या जवळ कोणी गेलं नाही. वडगाव निंबाळकर पोलीस तसेच ग्रामपंचायत वाणेवाडी यांच्या तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि लांबच्या नातेवाईकांच्या पुढाकारातून या वयोवृध्द महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लॉकडाउनमध्ये सर्वच वाहतूक यंत्रणा बंद असतानाही ही वयोवृध्द महिला मुंबईवरून मुलाच्या घरून याठिकाणी आलीच कशी, असा प्रश्न सर्वांना पडला असताना काल एक चार चाकी गाडी या म्हतारीला या ठिकाणी सोडून परत गेल्याचे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांनी सांगितले.