आणि.. ‘ ते ’ ही पडले बारामतीच्या प्रेमात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 08:08 PM2018-06-22T20:08:21+5:302018-06-22T20:13:20+5:30

बारामती परिसराला आजपर्यंत पंतप्रधान मोदी यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या देशातील राष्ट्रीय नेत्यांनी अलीकडील काही वर्षांत भेटी देऊन पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आता..

And .. 'They' fell in love with Baramati | आणि.. ‘ ते ’ ही पडले बारामतीच्या प्रेमात 

आणि.. ‘ ते ’ ही पडले बारामतीच्या प्रेमात 

Next
ठळक मुद्देबारामती येथील कृषी विज्ञान केंद्र देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांसाठी रोल मॉडेल देशातील शेतकऱ्यांपुढे आणि शेतीसमोर आव्हाने भरपूर शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे येथील ग्रामीण भागाचा कायापालट

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना देखील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीची भुरळ पडली आहे. उपराष्ट्रपती नायडू यांनी येथील कृषी विज्ञान केंद्रासह विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपतींनी या संस्थांचे कौतुक केले.
बारामती परिसराला आजपर्यंत पंतप्रधान मोदी यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या देशातील राष्ट्रीय नेत्यांनी अलीकडील काही वर्षांत भेटी देऊन पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. आता उपराष्ट्रपतींनी देखील आज पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी येथे भेट दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना उपराष्टपती व्यंकय्या नायडू म्हणाले, की आज माझ्यावर उपराष्ट्रपती म्हणून घटनात्मक जबाबदारी आहे. पूर्वी मी सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष असताना जे करायचे ते बोलू शकत होतोे. पण या पदावर आल्यापासून कृतीतून त्या पदाची प्रतिष्ठा राखण्याचे काम करत आहे. उपराष्ट्रपती म्हणून मला केवळ बसून राहायचे नाही. त्यामुळे मी भारतातल्या वेगवेगळ्या संस्थांना भेट देत आहे, माहिती घेत आहे. सर्व राज्यांत जाऊन तेथील तरुण पिढीला राष्ट्रप्रेम, भारताचा ऐतिहासिक ठेवा व त्याचे महत्त्व, संस्कृतीची माहिती देऊन हा ठेवा जपण्याचे आवाहन करत आहे.
येथील कृषी विज्ञान केंद्र, विद्या प्रतिष्ठानचे उपराष्ट्रपतींनी कौतुक करताना ज्येष्ठ नेते शरद पवार, कै . अप्पासाहेब पवार, अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांची देखील स्तुती केली. नायडू म्हणाले, की येथील कृषी विज्ञान केंद्र देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांसाठी रोल मॉडेल आहे. आज ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात असा बदल पाहायला मिळाल्याचे समाधान आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारे संशोधन या ठिकाणी करण्यात आले आहे. हे काम पाहून प्रभावित झालो आहे. देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी भेट देऊन तेथील संशोधनाची माहिती घ्यावी. कृषी विस्तार क्षेत्रात सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी काम करण्याची गरज आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनेही संशोधनात मूलभूत काम केले आहे. देशातील शेतकऱ्यांपुढे आणि शेतीसमोर आव्हाने भरपूर आहेत. मात्र, त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी येथे संशोधन क्षेत्रात होत असलेले काम मूलभूत स्वरूपाचे आहे. सर्व संसद सदस्यांना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून बारामतीमध्ये भेट देण्यासाठी सांगणार आहे, असे नायडू म्हणाले.
या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.
..........................
...पार्श्वभूमी ग्रामीण असल्यामुळे आमचा स्नेह जुळला
शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे येथील ग्रामीण भागाचा कायापालट झाला. आमच्या दोघांचीही पार्श्वभूमी ग्रामीण असल्यामुळे आमचा स्नेह जुळला. माझ्या राजकीय जीवनाच्या प्रारंभापासून ज्येष्ठ नेते पवार यांच्याशी माझे वेगळे संबंध आहेत. आमचे राजकीय विचार वेगळे असले, तरी ग्रामीण विकासाबाबत त्यांचे प्रेम, त्यांचा दृष्टिकोन  आणि सतत ज्ञान संपादन करण्याची सवय यांमुळे आमची मैत्री कायमच राहिली, अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी असलेले स्नेहबंध उलगडले.
०००
...उपराष्ट्रपतींचा नोंदवहीत अभिप्राय
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल, संग्रहालयाला भेट दिली. या वेळी नायडू यांनी संग्रहालयात पवार यांना विविध ठिकाणांहून मिळालेल्या भेटवस्तू, त्यांची छायाचित्रे यांची पाहणी केली. त्यानंतर नायडू यांनी ‘हे संग्रहालय एक असामान्य व्यक्तिचित्रण करणारे प्रतिबिंब आहे. अतिशय मौल्यवान असा हा ठेवा असून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो जतन करण्यात आला आहे. नवीन पिढीला हा ठेवा निश्चित मार्गदर्शक ठरेल,’ असा अभिप्राय नोंदवहीत नोंदविला.
०००
...‘ लोकमत’ मध्ये योग दिनावर लिहिल्याचा उल्लेख
पत्रकार परिषद पार पडल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांसह माध्यम प्रतिनिधींसमवेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छायाचित्रे काढली. त्यांनतर माध्यम प्रतिनिधींनी आपापली ओळख करून दिली. यावर आपणदेखील लिखाण करतो. ‘लोकमत’मध्ये योग दिनावर केल्याचा उल्लेख त्यांनी या वेळी आवर्जून केला.
०००

Web Title: And .. 'They' fell in love with Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.