...आणि त्यांनी खिशातून भरले वीजबिलाचे १२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:10+5:302021-03-08T04:11:10+5:30
वारजे- कष्टकरी व हातावर पोट असणारी सोसायटीचे वीजबिल १२ लाख रुपये आले. घरचे लाइट बिल भरायला पैसे नाहीत, ...
वारजे- कष्टकरी व हातावर पोट असणारी सोसायटीचे वीजबिल १२ लाख रुपये आले. घरचे लाइट बिल भरायला पैसे नाहीत, तर सोसायटीचे कॉमन मीटरचे बिल भरणार कोण? अशातच महावितरणने नोटिसा देऊन त्यांच्या सोसायटीचा वीजपुरवठा तोडला. त्यामुळे पाण्याची मोटार बंद होऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. अखेर वारजे येथील उद्योजक भारतभूषण बराटे धावून आले व त्यांनी स्वतःच्या खिशातून १२ लाख रुपये भरून या १० इमारतींचा पाण्याचा प्रश्न मिटवला.
वारजे येथील बीएसयूपी योजनेअंतर्गत बांधलेल्या म्हाडा कॉलनी वसाहतीमध्ये (छ. संभाजीनगर सोसायटी) ही घटना घडली आहे. या सोसायटीचा एका इमारतीचे चेअरमन मुन्ना सुपेकर सांगतात की, मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या दरम्यानचे आमच्या सोसायटीचे वीजबिल भरणा करायचा थकला होता. कडक लॉकडाऊनमध्ये हाताला काम नव्हते. पोटाला चिमटा काढून कसे तरी दिवस काढले. तीनशे रुपये महिना मेंटेनन्स चार्ज अनेकांनी भरला नाही तर आता स्वतःच्या घराचे आलेले हजारो रुपये वीजबिल भरायलाही पैसे नाहीत. त्यातच महावितरणने बिल भरण्याचा तगादा लावण्यासाठी नोटिसांचे सत्र सुरू केले व अखेर इमारतींचा वीज पुरवठा खंडित केला.
लाईट नाही तर पंप बंद, त्यामुळे या इमारतीतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करत गार्डन सिटीजवळील सार्वजानिक नळकोंडाळे गाठावे लागत होते. त्यामुळे अनेकांना पूर्वी राहत असलेले चाळीचे दिवस पुन्हा आठवले. अखेर सर्वांनी मिळून भारतभूषण आबा बराटे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यांनी सर्व रक्कम भरली.
-----------
सोसायटीत डी इमारतीचा मीटर जळाला होता. भरणाअभावी आय व जे इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. नागरिकांच्या मागणीनुसार वीजबिल भरणा करण्यासाठी टप्पे करण्यात आले आहेत. नागरिकांनीही बिल भरून सहकार्य करावे.
- रसिका कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता, महावितरण, वारजे विभाग
-------
मी बिगारी काम करते. आमच्या इमारतीचे देखील वीजपुरवठा खंडित होणार होता. आम्ही भारतभूषण आबांचे ऑफिस गाठून, विनवणी केली व त्यांनी बिल भरले. एखादा खासदारही काम करणार नाही, असे काम या तरुण मुलाने केले आहे.
- छाया रामवत, रहिवासी म्हाडा कॉलनी, ई (पवना) बिल्डिंग
--------------
फोटो ओळ:- म्हाडा कॉलनीत अभियंता रसिका कुलकर्णी यांना वीजबिलाचा चेक देताना भारतभूषण बराटे, सोसायटीतील नागरिक व महावितरण कर्मचारी.