...अन् जुळली ‘स्रेहा’ची शब्दमैफल

By admin | Published: February 21, 2017 03:18 AM2017-02-21T03:18:41+5:302017-02-21T03:18:41+5:30

शब्दरूपी संवादावरील प्रभुत्व हा विजयाबार्इंचा हुकमी एक्का, तर चिंतन आणि अभ्यासातून स्वरांची रंगणारी ‘मनस्वी’ बैठक ही

... and the word 'matching' | ...अन् जुळली ‘स्रेहा’ची शब्दमैफल

...अन् जुळली ‘स्रेहा’ची शब्दमैफल

Next

पुणे : शब्दरूपी संवादावरील प्रभुत्व हा विजयाबार्इंचा हुकमी एक्का, तर चिंतन आणि अभ्यासातून स्वरांची रंगणारी ‘मनस्वी’ बैठक ही किशोरीतार्इंची खासियत! जेव्हा शब्द आणि सूर एकत्रिपणे उमलू लागतात, तेव्हा त्याचा सुगंध आसमंतात दरवळू लागतो. त्यातूनच रंगली ‘स्नेहा’ची एक अनोखी मैफल! दोन कलासम्राज्ञींच्या सुरेल संवादातून ‘कानसेनां’ना अद्भुत तृप्तीची अनुभूती मिळाली.
‘माझे वयाच्या पंधराव्या वर्षी रंगभूमीशी लग्न झाले. किशोरी तर संगीतक्षेत्रातच जन्मली. सर्वच कला एकमेकांना पूरक असतात. आम्ही दोघी केवळ ‘मैत्रिणी’ नव्हे, तर ‘स्नेही’ आहोत. कारण, स्नेहामध्ये मैत्री आणि आदर असं अनोखं नातं असतं. नाटक आणि संगीत या दोन्ही प्रायोगिक कला आहेत. कितीही तयारी केली, तरी कला रंगमंचावर निर्माण होते आणि प्रेक्षकांमध्ये प्रसवते. तिचा जन्म इथेच होतो. जे निर्माण होतं ते इथेच. त्यासाठी नीरव पावित्र्य असावं लागतं. कलेची मूलतत्त्वे एकमेकांशी जुळणारी नसल्याने त्यात वेगळेपण नसतंच. भावनेपलीकडची दृकश्राव्य प्रतिमा आणि सत्याचे लेणे मला किशोरीकडून मिळाले’, अशा सहजसुंदर शब्दांत विजया मेहता आणि किशोरी आमोणकर यांचं ‘स्नेह’ उलगडत गेलं अन् रसिकही या शब्दमैफिलीत रममाण झाले. नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘गानसरस्वती’ महोत्सवात विजयाबार्इंनी किशोरीतार्इंप्रती भावना अलवारपणे व्यक्त केल्या.
‘स्वातंत्र्योत्तर काळातील आमची पहिली पिढी. मंतरलेल्या वातावरणात आपलं कर्तृत्व जागतिक पातळीवरती गाजवत असतानाच, आम्ही एकमेकींच्या क्षेत्रातही उत्सुकतेने डोकावत होतो. सर्वच क्षेत्रात नावीन्याचे वारे वाहत होते. एकत्र काम केले नाही, तरी आमच्यावर एकमेकींच्या कलेचे संस्कार होत होते. किंबहुना, एकमेकींच्या संगतीत आम्ही आपापले शोध घेत होतो’, असे सांगताना विजयाबाई म्हणाल्या, ‘कोणत्याही कलाकाराला श्रोत्यांच्या अस्तित्वाची जाणीव राहता कामा नये. टाळीसाठी काहीच करता येत नाही. कलाकार जेव्हा स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेत असतानाच स्वत:ला विसरुन जे विश्व संपन्न करतो, तीच त्याची खरी कला. प्रत्येक गायन, प्रयोग नव्याने निर्माण व्हायला हवा. किशोरीची समेवर येण्याची लडिवाळ पद्धत रसिकांना पुन्हा पुन्हा संगीताच्या प्रेमात पाडते.’ (प्रतिनिधी)

जीवनाची अनुभूती सांगण्याची योग्यता पाळावी
४‘विजया ही नाट्यक्षेत्रातील सरस्वती आहे’, असे म्हणत किशोरीतार्इंनी त्यांच्यातील स्नेहाचा आणखी एक पदर लडिवाळपणे उलगडला.
त्या म्हणाल्या, ‘सादर करायचे ते संगीत नाही, तर मन सादर करायचं.
मग, त्यात कलाकाराचं अस्तित्व उरत नाही. नटाने जीवनाची
अनुभूती सांगण्याची योग्यता पाळायची असते. त्यादृष्टीने आम्ही दोघीही नटीच आहोत.
४राग हा शब्द अत्यंत फसवा आहे. रागातील सुरांबरोबर अविरत संबंध ठेवणाऱ्यालाच तो कळतो. रागांचा सराव करताना केवळ स्वरांचे
राज्य निर्माण व्हायला हवे. कोणताही राग, स्वरांचा भाव मात्रेत
मोजता येत नाही. तो स्वर आपोआप साकार होत जातो. परब्रह्म एकच असेल, तर आम्ही दोघी वेगवेगळ्या रस्त्याने एकाच ठिकाणी जाणारी माणसं आहोत.
४कोणत्याही कलेच्या माध्यमातून स्वत: अमूर्त विश्वात रममाण होणं महत्त्वाचं. कलेची साधना त्या अमूर्त विश्वाची परिमिती मिळवण्यासाठी व्हायला हवी. स्नेहामध्ये दंभ,हट्ट उरत नाही. उरते ती माया आणि
तेच आमचे अस्तित्व’, अशी भावना व्यक्त करत ‘विजयाने केलेलं कौतुक हा माझा आजवरचा सर्वोच्च सन्मान आहे,’ असेही किशोरी आमोणकर म्हणाल्या.

Web Title: ... and the word 'matching'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.