...अाणि तरुणांनी पाॅर्नवर केली खुली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 06:34 PM2018-11-19T18:34:46+5:302018-11-19T18:36:48+5:30
विचारवेध या संस्थेतर्फे पॉर्न आणि मी या विषयावर तरुणांशी खुली चर्चा ठेवण्यात आली होती. या चर्चेत तरुणांनी खुलेपणाने पॉर्न या विषयावर आपली मते व्यक्त केली.
पुणे : पॉर्न या विषयावर तरुण - तरुणी मोकळेपणाने चर्चा करत आहेत असं चित्र दिसणं तसं अवघडच आहे. परंतु पुण्यातील भांडारकर रोडवरील सरस्वती बंगला मात्र याला अपवाद आहे. या बंगल्यातील रविवारची संध्याकाळ काहीशी वेगळी होती. विचारवेध या संस्थेतर्फे पॉर्न आणि मी या विषयावर तरुणांशी खुली चर्चा ठेवण्यात आली होती. या चर्चेत तरुणांनी खुलेपणाने पॉर्न या विषयावर आपली मते व्यक्त केली.
पुण्यातील विचारवेध या स्वयंसेवी संस्थेतर्फे विचारवेध चर्चा गट तयार केला असून या अंतर्गत विविध सामाजिक विषयांवर खुली चर्चा केली जाते. संस्थेने विविध मान्यवरांची 15 ते 20 मिनिटांची 250 भाषणे रेकॉर्ड केली असून ती युट्युब वर प्रकाशित केली आहेत. या चर्चागटाच्या माध्यमातून तरुणांना त्यांचे विचार खुले पणाने मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलपद्ध करून देण्यात आले आहे. रविवारी तरुणांनी पॉर्न आणि त्या अनुषंगाने येणारे विषय यावर चर्चा केली. यात मुलींनी सुद्धा मोकळेपणाने आपले अनुभव सांगितले. अनेकांनी पॉर्न बद्दल त्यांना माहिती कशी मिळाली, कुठल्या माध्यमातून मिळाली या बद्दल सांगितले. तसेच शास्त्रीय पद्धतीने लैंगिक शिक्षण विध्यार्थ्यांना अजूनही मिळत नसल्याची खंत ही व्यक्त केली. प्रत्येकाने पॉर्न आहारी न जाण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात या बद्दल आपली मते व्यक्त केली. तसेच चर्चेच्या शेवटी मुला मुलींमधील मैत्री वाढायला हवी तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य लैंगिक शिक्षण द्यायला हवे असा निष्कर्ष काढण्यात आला.
या उपक्रमाबद्दल संस्थेच्या सरिता आव्हाड म्हणाल्या, विचारवेध च्या माध्यमातून आम्ही तरुणांसाठी त्यांचे विचार खुलेपणाने व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलपद्ध करून देत आहोत. यात संबंधित विषयावरील तज्ज्ञांना आमंत्रित करून त्यांचेही विचार ऐकले जातात. या उपक्रमात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याची संधी दिले जाते. दर आठवड्याला एक विषय घेऊन आम्ही त्यावर चर्चा घडवून आणणार आहोत. या उपक्रमाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.